शिक्षणासाठी घरी आणलेल्या मुलींवर नाचगाणी करण्यासाठी पायाला बेडी घालून मारहाण करणार्‍या महिलेला आणि इच्छेविरूध्द लैगिंक अत्याचार करणार्‍या तरूणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडापैकी पन्नास हजार रूपये पिडीत मुलीला देण्याचे आदेश न्यायमूर्तीनी दिले.

याबाबत माहिती अशी, शैला  देवदास भोरे (वय ४९ रा. काननवाडी, ता. मिरज) हिने एका अल्पवयीन मुलींला शिक्षणासाठी घरी आणले होते. दोन महिने गेल्यानंतर घरातील काम करत नाही म्हणून छळ सुरू केला. तसेच  नाच करून, देवाची गाणी म्हणण्याचे काम करण्यास भाग पाडू लागली. नाचगाण्याच्या कार्यक्रमातून मिळालेले पैसे ती स्वत:कडेच ठेवत होती.

हेही वाचा >>> सोलापूर : तरुणाचे गुप्तांग कापून खुनाचा प्रयत्न; तिघांना ३० वर्षांची जन्मठेप

आयटोंबर २०१७ मध्ये पिडीतेला घेउन ही  महिला बुर्ली (ता. पलूस) येथील उरूसाला घेउन गेली. या गावी ओळखीच्या  महिलेच्या घरी थांबून आरोपी रोहित हणमंत आसुदे (वय २५ रा. नागठाणे ता. पलूस) याच्याशी ओळख करून दिली. त्याच्याशी शरीर संबंध ठेव नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने पिडीतेच्या इच्छेविरूध्द शरीर संबंध केले

यानंतर काननवाडी येथे आल्यानंतर पिडीतेच्या पायाला बेडी बांधून, झोपडीच्या छताला उलटे टांगून काठीने मारहाण केली. या त्रासाला कंटाळून पिडीता  मालगाव येथे नातेवाईकाकडे गेली होती. तेथून तिला परत आणून ११ जुलै २०१९  रोजी पंढरपूर येथे नेउन वयस्कर व्यक्तीसोबत लग्न कर, त्याच्याकडून सोने व इतर वस्तू मागून घे असे सांगितले. याला पिडीत मुलीने नकार  दिला. तेथेच सोडून महिला एकटीच परत गेली. पिडीताने भीक मागून काननवाडी येथे आल्यानंतर महिलेने तिला झाडाला बांधून मारहाण केली. तिच्या तावडीतून सुटून पिडीतांने कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलीसांनी तपास करून संशयिताविरूध्द सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पिडीतेचा जबाब, वैद्यकीय अहवाल, आणि परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयासमोर मांडण्यात आला. दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याचे सांगत महिलेला सात वर्षे आणि तरूणाला दहा वर्षाची शिक्षा व ७५  हजार रूपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. दंडापैकी ५०  हजार रूपये पिडीत मुलीला देण्याचे आदेश दिले.