ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. त्यांच्या निधनानंतर समाजातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी तसंच नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, “मला खरंच मोठा धक्का बसला जेव्हा मला पद्मभूषण श्री राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल कळलं. स्वातंत्र्य सेनानी जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल यांनी समाजात विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात त्यांच्या बजाज दुचाकी तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडवून आणले. परवडणाऱ्या वाहनामुळे गतिशीलता वाढली, उपजीविकेचे साधन मिळविण्यासाठीचा संघर्ष कमी झाला आणि सामाजिक-आर्थिक बदलाचे साधन बनले! उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आम्ही भारतीय त्यांचे ऋणी आहोत.माझ्या अत्यंत जवळच्या मित्राच्या निधनाने मी दु:खी आहे. भारताने एक उद्योगपती, एक परोपकारी आणि तरुण उद्योजकांसाठी दीपस्तंभ गमावला आहे! हमारा बजाज”

हेही वाचा – बजाज ऑटोचा आधारवड काळाच्या पडद्याआड ; ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यात निधन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही बजाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या शोकसंदेशात राज्यपाल म्हणतात, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देशात तसेच बाहेर मोठा विस्तार केला. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.”

सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला- अजित पवार

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोकसंदेशात पवार म्हणतात, “बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे”.