राहाता : शिर्डी शहरात पोलिसांनी राबवलेल्या भिक्षेकरी पकड मोहिमेत महाराष्ट्रासह इतर ७ राज्यांतील ४७ पुरुष व ९ महिला असे एकूण ५६ भिक्षेकरांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पुरुष भिक्षेकरी यांची विसापूर येथे तर महिला भिक्षेकरी यांची चेंबूर येथे रवानगी करण्याचे आदेश दिले. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी ही माहिती दिली.

शिर्डीत भिक्षेकरांकडून भाविकांना होणारा त्रास रोखण्याकरिता भिक्षेकरी यांची धरपकड मोहीम पोलिसांकडून राबवली जाते. शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शिर्डी शहरात मंदिर परिसरासह विविध ठिकाणी मोहीम राबवत भिक्षेकरी ताब्यात घेतले. पकडलेल्या भिक्षेकरी यांना शिर्डी पोलिसांनी जेवणही दिले व नंतर त्यांना न्यायालयात नेण्यात आले. महाराष्ट्रासह इतर सात परराज्यातील भिक्षेकरी मिळून आले.

नगर जिल्ह्यातील १७ पुरुष व ४ महिला असे २१ भिक्षेकरी मिळून आले. भिक्षेकऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील ४, छत्रपती संभाजीनगर २, जळगाव ३, बीड २ तसेच जालना, मुंबई, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती व कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रत्येकी १ भिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले. शिर्डीमध्ये येऊन भिक्षा मागणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रव्यतिरिक्त बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील भिक्षेकरी पोलिसांनी शिर्डीत पकडले आहेत.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिर्डीत दर तीन-चार महिन्यांनी भिक्षेकरी धरपकड मोहीम राबवली जाते. याच मोहिमेत तिघा भिक्षेकऱ्यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने प्रशासनाने आता अधिक खबरदारी घेत मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

उच्चशिक्षित आणि सफाईदार इंग्रजी

साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी प्रशासनाला भिक्षेकऱ्यांविरोधात विशेष मोहिमेत पुन्हा एकदा सफाईदार इंग्रजी बोलणारा भिक्षेकरी आढळला. या व्यक्तीचे नाव गणेश पिल्ले असून, तो मूळचा केरळचा रहिवासी आणि सध्या मुंबईत वास्तव्यास होता. उच्चशिक्षित पिल्ले यांची नोकरी करोना काळात गेल्यामुळे त्यांना भीक मागण्याची वेळ आली. कामाच्या शोधात दिल्लीहून रेल्वेने ते शिर्डीत आले असताना प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतले. गणेश पिल्ले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी भिकारी नाही. मी एनजीओच्या माध्यमातून कामाच्या शोधात शिर्डीत आलो आहे. नोकरीच्या शोधासाठी प्रयत्नशील आहे.