Jai Gujarat Slogan by Eknath Shinde: राज्यात मराठी-हिंदी असा भाषिक वाद पेटला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी २०२२ च्या सत्ताबदलाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. ते म्हणाले, “अमित शाहांच्या रणनीती आणि नेतृत्वाने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. अमित शाह आव्हानांना संधीत बदलतात. त्यांच्या या कार्यक्षमतेचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. त्यावेळी (२०२२) राज्यात सामान्य माणसाचे सरकार आणणे गरजेचे होते. पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन होतेच. पण अमित शाह माझ्यामागे पर्वतासारखे ठामपणे उभे होते.”

“सरकार बदलणे सोपे काम नव्हते. पण जेव्हा देशाच्या, राज्याच्या विकासाचा प्रश्न असतो, तेव्हा अशी पाऊले उचलावी लागतात. यासाठी मी अमित शाहांचे खूप आभार मानतो. त्यांच्यामुळेच आमचे डबल इंजिनचे सरकार जोरात धावत आहे”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

अमित शाह महाराष्ट्राचे जावई

“अमित शाह हे गुजराती असले तरी ते महाराष्ट्राचे जावई आहेत. ते होम मिनिस्टर असले तरी त्यांच्या घरातील होम मिनिस्टर आपल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. महाराष्ट्र आणि गुजरातने विकास, उद्योग, संस्कृतीच्या क्षेत्रात देशाला नेहमीच दिशा दाखवली आहे”, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जय गुजरात

एकनाथ शिंदे यांनी यावेळी अमित शाहांची स्तुती करण्यासाठी एक शेर ऐकून दाखवला. तो असा…

“आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,
दुश्मन क्या चीज है, तुफानभी अपना रुख बदल देता है
आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है,
आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है”

हा शेर सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली.