एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेलो असता मंठा येथे आपल्यावर दगडफेक झाली. दगडफेक करणारी व्यक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरील होती. आपण त्यावेळी अत्यंत संयमाने हा विषय हाताळला. मात्र, सेनेच्या नेतृत्वाला निर्णयच घेता येत नाहीत, अशी टीका खासदार गणेश दुधगावकर यांनी केली. ‘शिवसेनेचा शेवटचा खासदार’ अशी आपली नोंद राहील, असे सांगत त्यांनी निवडून येणारा खासदार राष्ट्रवादीचा असेल, असे सूचित केले. खासदारकी महत्त्वाची नाही, स्वाभिमान महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
पुणे येथे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दुधगावकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. विविध प्रश्नांना उत्तरे देताना गेल्या एक-दीड वर्षांतील राजकीय घडामोडीही सांगितल्या. आपल्यावर दगडफेक झाल्यानंतर या घटनेचा आपण पक्षनेतृत्वाकडे निषेध नोंदवला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बठकीला ‘ते’ जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख दोघेही उपस्थित होते. पक्षाचा जिल्हाप्रमुख आपल्याला दगड मारतो, तेव्हा हा दगड मला आहे की तुम्हाला, असा प्रश्न आपण ठाकरे यांना केला होता. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई होईल असे वाटले होते. प्रत्यक्षात ती झालीच नाही आणि तेव्हापासून आपण मातोश्रीवर पाऊल ठेवले नाही.
आपण मूळचे काँग्रेस विचारसरणीचे. सेनेत केवळ ‘प्रतिनियुक्ती’वर होतो. आता प्रतिनियुक्तीचा काळ संपला. आपल्याला कोणतीही निवडणूक लढवायची नव्हती. याउलट सेनेचे निवडून आलेले खासदार सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या संपर्कात होते. यातल्या फुटीर खासदारांनाच सेनेने उमेदवारी दिली. आपण उमेदवारी मागितलीही नव्हती, असे सांगून दुधगावकर यांनी सध्या समाधानी आहोत, असे सांगितले. सेनेने उमेदवारी दिल्यानंतर आपण जे विक्रमी मतदान घेतले ते पूर्वी कोणीही घेतले नव्हते. तब्बल १८ वषार्ंनंतर आपल्याला राजकीय सन्मान मिळाला त्यावरच आपण समाधानी आहोत. निवडणुकीच्या राजकारणात थांबण्याचा निर्णय आपण घेतला आहे. खासदारकीच्या काळात जनतेच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावता आले याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करू, त्यासाठी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचीही समजूत काढू, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2014 रोजी प्रकाशित
सेना नेतृत्वाला निर्णय घेता येत नाही – खा. दुधगावकर
एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेलो असता मंठा येथे आपल्यावर दगडफेक झाली. दगडफेक करणारी व्यक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरील होती. आपण त्यावेळी अत्यंत संयमाने हा विषय हाताळला.

First published on: 29-03-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader is not to be decision maker mp ganesh dudhgaonkar