Shiv Sena response allegations Gulabrao Patil Hilal Mali ysh 95 | Loksatta

गुलाबरावांच्या आरोपांना शिवसेनेचे सडेतोड प्रत्युत्तर

गुलाबरावांच्या या आरोपांना मागील विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून पराभूत झालेले सेना-भाजप युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्ममान सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी सडतोड प्रत्युत्तर दिले.

गुलाबरावांच्या आरोपांना शिवसेनेचे सडेतोड प्रत्युत्तर
हिलाल माळी

संतोष मासोळे

धुळे : एकेकाळी शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख होणारे गुलाबराव पाटील यांच्या तोफेचा मारा ते शिंदे गटात सामील झाल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेतील इतर नेत्यांना सहन करावा लागत आहे. संजय राऊत हे ‘ईडी’च्या कचाटय़ात सापडल्यापासून गुलाबरावांवर ठाकरे गटाकडून होणारी टीकेची धार काहीशी बोथट झाली असताना धुळे येथील हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात मात्र गुलाबरावांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला सडतोड उत्तर सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांच्याकडून देण्यात आले.

शिंदे गटाच्या वतीने नुकताच येथे मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात गुलाबराव पाटील यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आरोप आणि टीकेमुळे चांगलाच गाजला. खानदेशी भाषेतील ठसकेबाज वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाबरावांची जीभ काही वेळा घसरल्याचेही दिसून आले. उपस्थितांकडून भाषणाला प्रतिसाद मिळू लागला की, भल्याभल्यांचे असे होते. पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावांनी भाषणात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांना प्रामुख्याने लक्ष्य केले. भानामती केल्यासारखे उद्धव ठाकरे निर्णय घेत होते, असे सांगून त्यांनी कट्टर शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. आपल्याच उमेदवारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत तडजोडी केल्याचा आरोप करून त्यासाठी गुलाबरावांनी धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या मतदारसंघांचे उदाहरण दिले. शिवसेनेने हिलाल माळी यांना धुळे ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दिली असती तर ते ५० हजार मतांनी विजयी झाले असते. पण, त्याऐवजी त्यांना ऐनवेळी धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली. आपल्याच लोकांना संपविण्यासाठी त्यांनी सुपारी दिली होती, असा आरोप त्यांनी केला.

गुलाबरावांच्या या आरोपांना मागील विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून पराभूत झालेले सेना-भाजप युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्ममान सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी सडतोड प्रत्युत्तर दिले. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, भाजपने धुळे ग्रामीणचाच हट्ट करून शिवसेनेची पारंपरिक जागा मागून घेतली. बदल्यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला होता. या वाटाघाटीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांना धुळे शहरातील उमेदवार निवडून आणण्याचा विश्वासही दिला होता. परंतु, आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने राजवर्धन कदमबांडे यांच्या रूपाने पुरस्कृत उमेदवार उभा केला. शिंदे गट ज्यांच्या सोबत जाऊन बसला तो पक्ष असा विश्वासघातकी आहे, अशी पूर्वपीठिका माळी यांनी मांडली. गुलाबरावांच्या मतदारसंघातही भाजपने बंडखोर उमेदवारास बळ दिले होते, तेव्हा गुलाबरावांनी भाजपविरोधात कसा आकांडतांडव केला होता, तेही माळी यांनी दाखवून दिले. धुळय़ातून शिंदे गटाच्या आरोपांना इतक्या आक्रमकतेने उत्तर मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. परंतु, ठाकरे गटाचा हा आक्रमकपणा गुलाबरावांच्या दौऱ्याचा निषेध करताना फारसा दिसला नाही. पन्नास खोके, एकदम ओके या घोषणेपुरताच तो मर्यादित राहिला. त्यामुळे निषेधाचा केवळ एक सोपस्कार पार पाडला गेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सांगलीत भाजपला दिलासा; खासदार आणि आमदारातील दुरावा दूर

संबंधित बातम्या

“सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?
“मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
VIDEO: भाषण करताना स्टुलवर उभे राहिल्याने मनसेची टीका, सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “माझ्या पायाखाली…”
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: फडणवीसांची अमित शाहांशी फोनवरून चर्चा , नेमकं काय बोलणं झालं?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द