Arjun Khotkar On Kailas Gorantyal : काँग्रेसचे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शनिवारी एका कार्यक्रमात आपल्या पराभवाबद्दल बोलताना खदखद व्यक्त केली होती. तसेच आपण पाच वर्ष वाट पाहणार नाहीत, जालन्यात राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा, असं विधानही त्यांनी केलं होतं. या बरोबरच जालन्यात असं राजकारण आहे की मतलब के है यार मगर दिल के सब काले है, तसेच जालन्यात अस्तिनचे साप खूप आहेत, असं म्हणत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी कोणाचंही नाव न घेता टीका केली होती. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे आहे? याबाबत चर्चा रंगली होती. यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या विधानाला प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे. “कैलास गोरंट्याल यांची दुकानदारी मी बंद करणार आहे”, असं अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

कैलास गोरंट्याल यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलेल्या विधानावर आता अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोतकर म्हणाले, “निवडणुकीत निवडून आलो तर आपल्यामुळे आलो आणि पराभव झाला तर लोकांमुळे झाला. असा दोष जनतेला देणं हे चांगलं नाही. मी देखील अनेकदा पराभूत झालो. पण मी कधीही जनतेला दोष दिला नाही. तुम्ही जर फतव्याचं बोलत असताल तर त्याच फतव्यामुळे तुम्ही निवडून आला होतात. पराभव पचवावा लागतो, पण पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यात नाही. मला असं वाटतं की आता कैलास गोरंट्याल यांचं दुकान बंद होणार आहे. त्यांची धडपड ही महानगरपालिकेची आहे. कारण त्यांचा पोटापाण्याशी संबंधित विषय आहे. मात्र, त्यांची हीच दुकानदारी मी यावेळेस बंद करणार आहे”, असा इशारा अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांना दिला.

हेही वाचा : Kailas Gorantyal : “जालन्यात राजकीय भूकंप कसे होतात तुम्ही पाहा”, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं मोठं विधान, चर्चांना उधाण

अर्जुन खोतकर पुढे म्हणाले, “माझं त्यांना हेच सागणं आहे की केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. या ठिकाणी जालन्यात काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर स्वत:च्या पायावर दगड पाडून घेूऊ नका”, असा सूचक इशारा अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांना दिला.

कैलास गोरंट्याल काय म्हणाले होते?

“आमचं राजकारण जालन्यात आहे. जालन्यात जास्त काम केलं तर लोक जाना म्हणतात. काम करा, पण असं वाटलं पाहिजे की काम करत आहोत. माझे मित्र राजेश टोपे यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. पण लोकांनी त्यांना यावेळी जाना (निवडणुकीत पराभव झाला त्याबद्दल) म्हटलं. मलाही लोकांनी जाना (पराभव झाला) म्हटलं. सर्वात जास्त काम कोणी केलं असेल तर आम्ही केलं. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी आम्ही जास्त काम केलं, त्या-त्या ठिकाणी माझ्या विरोधात फतवा निघालाठ, असं कैलास गोरंट्याल म्हणाले होते.

“जालन्यात असं आहे की, मतलब के है यार मगर दिल के सब काले है! मोका मिलतेही ये डसने वाले है! किस मे कितना जहर है हमको पता है की सबसे ज्यादा साप हमीने पाले है!, जालन्यात अस्तिनचे साप खूप आहेत. पण मी आता पाच वर्ष थांबणार नाही. मी एकदा बोललो तर बोललो. मी पाच वर्ष वाट बघणार नाही. आता निवडणुका आल्या आहेत पण विधानसभेच्या नाहीत. मी आज तुम्हाला शब्द देतो की जालन्यात राजकीय भूकंप कसे कसे येतात तुम्ही पाहा. एकेक भूकंप कसा-कसा येईल हे सगळ्यांनाच कळेल”, असं विधान कैलास गोरंट्याल यांनी केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group mla arjun khotkar on congres ex mla kailas gorantyal in jalna politics gkt