कोकणात घट्ट पाळेमुळे असलेल्या शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीच्या निकालात वर्चस्व राहील, याबाबत बहुतांशी एकमत असले तरी मिळणाऱ्या जागांबाबत भिन्न मतप्रवाह आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये मिळून विधानसभेच्या १५ जागा आहेत. त्यांपैकी रायगडातील ७ जागांसाठी सेना, शेकाप आणि काँग्रेस पक्षांमध्ये मुख्य लढती असून श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत यांच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रशांत ठाकूर पनवेल मतदारसंघात भाजपचे खाते खोलतील, अशी अपेक्षा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच जागांपैकी दापोली, चिपळूण आणि राजापूर या जागांवर मागील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. त्यांपैकी दापोली व राजापूर पुन्हा शिवसेनेकडेच राहील, असा अंदाज असला तरी चिपळूणबाबत दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी तगडे आव्हान उभे केले असून मतदान झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या पाठिराख्यांनी फटाके वाजवून विजयाची ग्वाही दिली. रत्नागिरी मतदारसंघातही असेच चित्र असून येथे निवडणुकीच्या काही दिवस आधी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी मंत्री उदय सामंत यांना परंपरागत प्रतिस्पर्धी व भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी कडवी लढत दिली आहे. दोघांचीही भिस्त अन्य पक्षांतून फुटणाऱ्या मतांवर आहे. त्यामुळे येथे निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे (कुडाळ) आणि त्यांचे चिरंजीव नितेश (कणकवली) यांच्या निवडणूक निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक राणेंच्या विरोधात पुन्हा एकवार रिंगणात असून त्यांच्यासाठी या वेळी जास्त अनुकूल वातावरण असल्याची चर्चा आहे. भाजपचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांची नितेश यांच्याशी मुख्य लढत असून जिल्ह्यातील जातीय समीकरणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचा प्रभाव, यावर जठारांचा विजय अवलंबून आहे. त्या तुलनेत सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर यांची वाटचाल सोपी असल्याचे मानले जाते.
बहुरंगी लढतींमुळे तिन्ही जिल्ह्यांमधील काही निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अंतिमत: आकडय़ांच्या खेळामध्ये शिवसेना बाजी मारील, अशी चिन्हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2014 रोजी प्रकाशित
सेनेच्या वर्चस्वाबाबत खात्री, संख्येबाबत संभ्रम
कोकणात घट्ट पाळेमुळे असलेल्या शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीच्या निकालात वर्चस्व राहील, याबाबत बहुतांशी एकमत असले...

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 19-10-2014 at 04:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena will be sound in konkan