राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजपानं गेल्या दोन दिवसांत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याविरोधात रान उठवलेलं असतानाच आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यामुळे त्यांच्याविरोधातही भाजपानं टीकेचा सूर तीव्र केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकेर गटानं राहुल गांधींच्या विधानाशी असहमत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, यानंतरही हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नसताना आता या वादात सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नेहरुंविषयी केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रणजीत सावरकरांना प्रत्युत्तर देतानाच त्यांना सल्लाही दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते रणजीत सावरकर?

आधी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानांनंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून रणजीत सावरकरांनी जवाहरलाल नेहरूंबाबत गंभीर दावा केला आहे. “पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षं भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली”, असा दावा रणजीत सावरकरांनी माध्यमांशी बोलताना केला.

“राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण!

“कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थित केले म्हणून…”

दरम्यान, यावरून राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रसारमाध्यमांनी विचारणा करताच संजय राऊतांनी त्यावरून रणजीत सावरकरांना सबुरीचा सल्ला दिला आहे. “पंडित नेहरूंनी काय केलं हे देशाला माहिती आहे. नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, अशफाकउल्ला खान, मौलाना आझाद, लालबहादूर शास्त्री, वीर सावरकर या सगळ्यांचं योगदान आहे. कुणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला हवं. ही आपली परंपरा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“नेहरूंनी एका महिलेसाठी भारताची फाळणी केली आणि १२ वर्षे…”, सावरकरांच्या नातवाचे गंभीर आरोप

“…यासाठी हा देश नेहरूंचा ऋणी आहे”

“आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत. आम्ही सगळे सावरकरांसाठी लढाई करतो आहोत. पण या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात, स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यात, विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं आहे. नाहीतर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची धर्मांध राष्ट्र म्हणून अवस्था आहे, ती नेहरूंनी भारताची होऊ दिली नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut slams ranjit savarkar remarks on nehru pmw