अहिल्यानगर : श्रीरामपूरमधील ज्योती साळुंके हिचा सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करून तिचा खून केला. सन २०२१ मध्ये झालेल्या या घटनेत अंगावर जखमा असतानाही आत्महत्या केल्याचा शवविच्छेदन अहवाल देण्यात आला. कुटुंबियांची मागणी असतानाही खूनाऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात योग्य पुरावे सादर न केल्याने आरोपींना जामीन मिळाला. या प्रकरणात पुन्हा तपास करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी आज, मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. पोलिस अधीक्षक घार्गे यांनी स्वतंत्र पोलिस अधिकारी नियुक्त करून फेरतपास करू, असे आश्वासन दिल्याचे देसाई यांनी सांगितले.

मंगळवारी देसाई व अनर्थे कुटुंबियांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. देसाई म्हणाल्या की, पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्ह्याचा तपास करताना विविध प्रकारच्या फॉरेन्सिक तपासण्या होत आहेत. सर्वांनीच या प्रकरणात गांभीर्याने दखल घेतल्याने अनर्थे कुटुंबियांनाही त्यांच्या मुलीला न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. या प्रकरणात घटनेनंतर तीन शवविच्छेदन अहवाल देण्यात आले. सुरुवातीच्या अहवालात अंगावर जखमा नसल्याचे सांगण्यात आले. कुटुंबियांनी आक्षेप घेऊन त्यांच्या मुलीचा खून झाल्याचे सांगत तसा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यातही योग्य पुरावे सादर न केल्याने आरोपींना जामीन मिळाला. या प्रकरणी तीन शवविच्छेदन अहवाल देणारा डॉक्टर आरोपीचा मित्र आहे, त्यालाही सहआरोपी करावे, अशी मागणी आहे. पोलिस अधीक्षक घार्गे यांनी स्वतंत्र पोलिस अधिकारी नियुक्त करून फेरतपास करू, असे आश्वासन दिल्याचे देसाई यांनी सांगितले.

मृत महिलेचा भाऊ सचिन अनर्थे व कुटुंबीयांनीही आमच्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली तर, सचिन अनर्थे यांनी आरोपी पतीचा भाऊ राजकीय पार्श्वभूमीचा आहे. त्यानेही तपासात हस्तक्षेप केला. तो मंत्र्यांच्या जवळचा असल्याचा दावाही अनर्थे यांनी केला.

महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकीय सुट्टीवर

राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढतअसताना राज्य महिला आयोगाकडून अपेक्षित प्रतीसाद गरजेचा आहे. मात्र, या पदावर राजकीय पदाधिकारी असल्याने अनेकवेळा प्रकरणे मिटवली जातात. त्यामुळे महिला आयोगावर राजकीय पदाधिकारी नको, अध्यक्ष पूर्णवेळ महिलांसाठी काम करणाऱ्या हव्यात. आज महिला आयोग सुट्टीवर आहे, कारण त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे. राजकीय सोयीसाठी, पदे वाटण्यासाठी महिला आयोगावर नियुक्त केले जातात. हे चुकीचे आहे. दुसरीकडे महिला आयोगात सदस्यही नियुक्त केलेले नाहीत. कुणी सदस्य पदासाठी अर्ज केला तर त्यांना आधी पक्षात प्रवेश करा, असे सांगितले जाते, असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला.