संगमनेर : केंद्रातील भाजपा सरकारमुळे घटना आणि लोकशाही धोक्यात आली आहे. हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला असून, त्यामुळे देश देशोधडीला लागेल. मोदींच्या हाती पुन्हा सत्ता दिली तर लोकशाही धोक्यात येईल, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.माजी केंद्रीय मंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते दिवंगत अण्णासाहेब शिंदे आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळय़ात रविवारी ते प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरमध्ये बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

याप्रसंगी सिद्धरामय्या म्हणाले की, पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आत्ताचे सत्ताधारी कुठेही नव्हते. या देशातील जनतेला मुबलक अन्न मिळते. यामागे स्वातंत्र्यापासून काँग्रेसने केलेले रचनात्मक काम आहे. सध्या देशात हुकुमशाही पद्धतीने काम चालू असून, देश संकटात आहे. म्हणून आता जनतेने जागृत झाले पाहिजे. सहकार चळवळ ही जनतेच्या मालकीची आहे. जनता या चळवळीची चालक आहे त्यात केंद्राचा हस्तक्षेप कायद्याविरोधी आहे. केंद्र सरकारने राज्यातल्या सहकारात ढवळाढवळ करणे हे घटनाविरोधी आहे. या विरोधात आपण लढून हे अतिक्रमण हाणून पाडले पाहिजे. भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या इथल्या सहकारी संस्था माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत. इथल्या सहकाराचे यशस्वी जाळे, इथला हिरवागार समृद्ध परिसर पाहून आपण भारावून गेलो आहोत.

हेही वाचा >>>“सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला म्हणून काहींना पोटदुखी, राजकीय वारसा असलेल्यांनीच…”, एकनाथ शिंदेंचा सवाल

आमदार आव्हाड म्हणाले की, अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात यांनी या भागात रुजविलेला गांधीवाद आमदार बाळासाहेब थोरात पुढे नेत आहेत. सहकारामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची सामाजिक, आर्थिक स्थिती उंचावली. सहकार चळवळ ही माणुसकीची चळवळ आहे.

आव्हाडांविरोधात घोषणाबाजी

श्रीरामांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड वादात सापडले आहेत. या कार्यक्रमाला ते येणार म्हणून संगमनेर मधील काही हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोरील मार्गावर काही काळ आंदोलन करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.