जळगाव : कापूस, केळी, सुवर्णपेढ्या, पाइप, ठिबक, डाळ, चटई या उद्योगांनी समृद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र असून, येथील उत्पादित विजेचा उपयोग ग्रीड पद्धतीने जिल्ह्यासह इतरत्र केला जातो. सुवर्णनगरी जळगावमध्ये आरोग्य व शिक्षण व्यवस्थेतही लक्षणीय बदल होत आहेत.
शिक्षण व्यवस्था, सिंचन प्रकल्प, यामुळे जळगाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील १,४८७ गावांचे विद्याुतीकरण झाले आहे. जिल्ह्यात साडेसहा हजारहून अधिक दशलक्ष किलोवॉट विजेची गरज आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात २८९ मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभे राहत आहेत.
हेही वाचा >>> जालना शहरातील एटीएम चोरट्यांनी पळवले
जिल्ह्यात मध्य व पश्चिम रेल्वेच्या एकूण ३६० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे जाळे असून, यात मध्य मार्गावर ३४ व पश्चिम मार्गावर आठ अशी ४२ स्थानके आहेत. जळगाव-सुरत या पश्चिम रेल्वे मार्गांपैकी ७१ किलोमीटर मार्ग जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात १५ हजार ९४१ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी ४२१ किलोमीटर आहे.
जिल्ह्यात मालवाहू वाहनांची संख्या सव्वालाखहून अधिक आहे. जिल्ह्यात २०२२ अखेर विविध प्रकारच्या वाहनांची संख्या १० लाख ७९ हजारांहून अधिक होती. यात वाढ होऊन मार्च २०२३ अखेर ती ११ लाख २५ हजार ८८९वर पोहोचली. जिल्ह्यात २४६४ प्राथमिक, ९२१ माध्यमिक शाळा तर १०२ उच्चशिक्षण संस्था आहेत. यामुळे कुशल मनुष्यबळ निर्मितीला एकप्रकारे चालना मिळते.
वैद्याकीय केंद्राची मुहूर्तमेढ
जळगावमधील चिंचोली येथे वैद्याकीय केंद्र उभारले जात आहे. या ठिकाणी शासकीय वैद्याकीय, आयुर्वेद, दंतचिकित्सा आणि राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी आणि फिजिओथेरेपी अशी महाविद्यालये प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात २३ शासकीय रुग्णालये, ३७ दवाखाने, ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ४४२ उपकेंद्रांतून आरोग्यसेवा पुरविली जाते. जळगाव जिल्हा शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाच अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहे आहेत.
© The Indian Express (P) Ltd