सावंतवाडी : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे धारदार शस्त्रांनी वार करून खून झालेल्या अवस्थेत सापडलेल्या बेंगळुरू येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी या प्रकरणी थेट बेंगळुरू येथे तपास करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हा खून मालमत्तेच्या वादातून झाला असावा, अशी दाट शक्यता असून, या कटामागील ‘मोठे मासे’ लवकरच जाळ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
अवघ्या तीन दिवसांत ओळख पटवून, बेंगळूरपर्यंत तपास
कणकवली – साळीस्ते येथे अज्ञात मृतदेह सापडल्यानंतर, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत त्याची ओळख पटवली होती. मृतदेह बेंगळूर येथील डेंटल कॉलेजचे मोठे पदाधिकारी आणि अब्जावधी संपत्ती असलेले डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची गती वाढवत, स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि कणकवली पोलिसांची तीन पथके थेट बेंगळूर येथे रवाना केली.
तीन संशयित ताब्यात, आणखी एक आरोपी मार्गावर
या तपास मोहिमेत पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. खुनाच्या कटात सहभागी असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांचे एक पथक बुधवारी पहाटे कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. तर, खुनाच्या कटातील चौथ्या संशयिताला घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे
- सुभाष सुब्रायप्पा एस. (३२, रा. अलवत्ता तिमसंग्रा, श्रीनावस पुरम, जि. कोलार, कर्नाटक)
- नारायण स्वामी मूर्ती (३६, रा. अलवत्ता तिमसंग्रा, श्रीनावस पुरम, जि. कोलार, कर्नाटक)
- मधुसूदन सिद्दय्या तोकला (५२, रा. बेंगळूर)
अब्जावधींच्या मालमत्तेचा वाद?
डॉ. श्रीनिवास रेड्डी यांची बेंगळुरू येथे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या आईच्या नावावर मोठे वैद्यकीय रुग्णालय व कॉलेज असून, त्यांची संपत्ती अब्जावधी रुपयांची असल्याचा अंदाज आहे. डॉ. रेड्डी अविवाहित होते. त्यामुळे, बेंगळूर येथील याच मालमत्तेच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे फेकला, तर गाडी दोडामार्ग तालुक्यात टाकली, असा पोलिसांना संशय आहे.
गुन्हा घडवण्यामागे मोठे लोक सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय असून, या आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा पुढील तपास वेगाने सुरू असून, लवकरच या खुनामागील नेमके कारण आणि कटात सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
