जालना : खरीप पीक कर्ज वितरणाच्या संदर्भात बँकांची कूर्मगती असल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अग्रणी बँकेत जाऊन जाब विचारला. पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्यांकडून पीक कर्ज वितरणाची माहिती घेऊन उद्दिष्टाच्या तुलनेत कमी प्रमाणावर पीक कर्ज वितरित झाले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी बँक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे आदेश असतानाही अनेक बँकांनी पीककर्जाचे पुनर्गठण केलेले नाही. अनेक कारणे दाखवून प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे.

सार्वजनिक बँकांची पिछाडी मागील १६ जूनपर्यंत जिल्ह्यात

सर्व बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत २७ टक्केच पीक कर्ज वितरित केले होते. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या तुलनेत ५५ टक्के तर ग्रामीण बँकेने ५४ टक्के कर्ज वितरित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत १५ टक्के, व्यापारी बँकांनी १४ टक्के तर खासगी बँकांनी १२ टक्के एवढे कमी कर्ज वितरित केले होते.