सोलापूर जिल्हा दुष्काळी भाग म्हणून ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांत पावसाचे वाढलेले प्रमाण, पूर, जलयुक्त शिवार योजना, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागणे यांसारख्या बाबींमुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढले. मात्र, यंदा सोलापूर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पूरपरिस्थिती ओढावली. या संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. गावात, घरात, शेतात, इतकेच काय महामार्गावरदेखील पुराचे पाणी आले होते. सरकारी भाषेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रत्यक्ष शेतकरी उभा राहण्यासाठी वर्ष-दोन वर्षांचा कालवधी जाईल.
‘स्मार्ट सिटी’ म्हणून गणना झालेल्या सोलापूर शहरात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला. तसेच सोलापूर-तुळजापूर महामार्गावरदेखील पाणी आल्याने हा महामार्ग बंद होता. शहरात ओढे, नाले, नदी बुजवत किंवा त्यांचे मार्ग बदलत झालेली अनियंत्रित बांधकामे हे यामागचे प्रमुख कारण आहे.
जिल्ह्यातही या पुराचे संकट ओढवले. सीना नदी ही अहिल्यानगर, धाराशिव येथून पुढे जिल्ह्यात करमाळा, माढा, मोहोळ येथे येते. लगतच्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सीना नदीला पूर आला. त्याचे पाणी करमाळा, माढा, मोहोळ या नदीलगतच्या तालुक्यातील गावांना बसला. या ठिकाणीदेखील अतिवृष्टी आणि पुराचे पाणी आल्याने गावात, शेतात पाणीच पाणी असे विदारक चित्र होते. तसेच महामार्ग, रेल्वे सेवा विस्कळीत झाली. जनजीवनावर परिणाम झाला.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७२९ गावांना पुराचा फटका बसला. यात सहा व्यक्ती मृत झाल्या. ४९ जनावरे, तसेच लहान-मोठे १५ हजार ४१ कुक्कुटपालन पक्षी दगावले. ५४१ घरांची पडझड झाली. दोन लाख २२ हजार ८८१ शेतकरी बाधित, तर एक लाख ९५ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. सोलापुरात पडलेल्या पावसासोबतच लगतच्या जिल्ह्यातील मोठ्या पावसाचाही फटका सोलापूरला बसला. पुरामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू, संसार वाहून गेला. उभी पिके पाण्याखाली गेली. सरकारची मदत मिळेल, परंतु यातून पुन्हा उभे राहण्यास खूप वेळ लागेल.