सोलापूर : अनधिकृत बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाने प्लिंथ इंटिमेशन’ बंधनकारक केले आहे. बांधकाम परवाना मिळाल्यानंतर त्यानुसार सुरू झालेल्या बांधकामात पायाभरणी पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहे. यातून बांधकाम परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तेवढीच जबाबदार होण्यासाठी मदत होणार आहे.

महापालिका बांधकाम परवाना विभागात बेकायदा बांधकाम परवाने देणारी सोनेरी टोळी अलीकडेच उजेडात आली होती. यात महापालिका बांधकाम परवाना विभागातील तीन अधिकाऱ्यांसह चौघाजणांना अटक झाली होती. यात एकूण ९७ बांधकाम परवाने बेकायदा असल्याचे उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी शहरात ठिकठिकाणी होत असलेल्या बांधकामांची पाहणी केल्यानंतर त्यातही अनेक बेकायदेशीर बाबी आढळून आल्या आहेत. बांधकाम करताना इमारतीसाठी वाहनतळ गायब करणे, इमारतीचा अग्रभाग आणि आजूबाजूचा भाग मोकळा न सोडता तेथेही बेकायदा वाढीव बांधकाम करणे यांसारखे आक्षेपार्ह प्रकार आढळून आले आहेत.

याप्रकरणांची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी शहराच्या सुनियोजित विकासासाठी आणि बेकायदा बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाच्या १ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार, बांधकाम परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तेवढीच जबाबदार बनविण्यासाठी प्लिंथ इंटिमेशन’ बंधनकारक केले आहे.

या नव्या नियमावलीची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात आली आहे. ‘एकरूप विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली ‘ नुसार (यूडीसीपीआर) सर्व बांधकाम परवाने, सुधारित परवाने आणि वापर परवाने नोंदणीकृत परवानाधारक अभियंता किंवा वास्तुविशारद यांच्यामार्फत सादर केले जातात. या प्रस्तावासोबत संबंधित अभियंता किंवा वास्तुविशारदाच्या विहित नमुन्यातील कागदपत्रांवर सही करून मंजूर नकाशानुसार बांधकाम करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असते.

सध्या शहरातील बांधकामे करताना कायद्याचे सर्रास उल्लंघन करून वाढीव बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे केवळ नियमित आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत नाही, तर अशा अनधिकृत बांधकामामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम शहराच्या सौंदर्यावर आणि नियोजनावर होत असल्याचे पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सांगितले.

या प्रश्नावर प्रभावी उपायोजना करण्यासाठी आणि बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी प्लिंथ इंटिमेशन कार्यपद्धती आता नगररचना विभागाकडून मंजूर होणाऱ्या प्रत्येक बांधकाम परवाना प्रकरणात संबंधित नोंदणीकृत परवानाधारक अभियंता किंवा वास्तुविशारद यांना बंधनकारक करण्यात आली आहे. यात जिओ-टॅग छायाचित्रासह बीपीएमएस पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

या छायाचित्रांमध्ये त्यांना प्लिंथ इंटिमेशनमधील बांधकाम मंजूर नकाशानुसार विशेषतः सामासिक अंतराच्या नियमानुसार झाले असल्याचे प्रमाणित करावे लागेल. त्याची कार्यवाही शंभर टक्के होणे बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित नोंदणीकृत परवानाधारक अभियंता आणि वास्तुविशारदावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. ओंबासे यांनी दिला आहे.