सोलापूर : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून येत्या ३१ मे रोजी सुमारे २५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संबंधित कर्मचा-यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी सुट्टीतही विशेष शिबीर आयोजिले आहे. जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या मदतीने आयोजिलेल्या या विशेष शिबिरात निवृत्त कर्मचा-यांना सेवानिवृत्तीचे लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे.

जुन्या काळात अधिकृत जन्मदाखला नसलेल्या मुलांना शाळेत दाखल करताना तेथील शिक्षकांकडून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसाची १ जून हीच तारीख मुलांच्या जन्म तारीख म्हणून नोंद केली जात असे. गुरूजींनी नोंद केलेली विद्यार्थ्यांची १ जून ही जन्मतारीख अद्यापपर्यंत चालत आली आहे. हीच जन्मतारीख घेऊन शासकीय-निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले असे अनेक अधिकारी व कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होतात. जिल्हा परिषदेत ३१ मे रोजी एकाच दिवशी असे विविध विभागातील सुमारे अडीचशे कर्मचारी निवृत्त होत आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी त्यांच्या सेवेचे सर्व लाभ द्यावेत, अशा सूचना दिलेल्या आहेत.

हेही वाचा : “तुमचे सागर बंगल्यावरील बॉस झोपले होते का?”; प्रशांत जगताप यांचं राम सातपुतेंच्या टीकेला प्रत्युत्तर

त्यानुसार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी भविष्य निर्वाह निधी, ग्रॕच्युईटीसह निवृत्तिवेतनाचा लाभ मिळवून देण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे वित्त विभागाच्या मुख्य लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी सुट्टीच्या काळात निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा लाभ देण्यासाठी विशेष शिबीर आयोजिले आहे. या माध्यमातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा सुखद धक्का दिला आहे. दरवर्षी असे अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होतात पण नंतर त्यांना निवृत्तिवेतनासह अन्य कायदेशीर लाभासाठी हेलपाटे घालावे लागतात. ही समस्या ओळखून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.