“भाजपातले दुखावलेले नेते माझ्या संपर्कात आहेत त्यांची नावं मी जाहीर करणार नाही” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. “आमच्या पक्षातले लोक सेना आणि भाजपात जात आहेत. मात्र भाजपात गेल्या तीन ते चार वर्षांपासून निवडणूक लढवण्यासाठी जी माणसं काम करत आहेत ती माझ्या संपर्काता आहेत. मी त्यांची नावं जाहीर करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साम-दाम-दंड-भेद हे सूत्र वापरत आहेत” असाही आरोप जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यावरुन आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. करावे तसे भरावे या अर्थाची एक म्हण वापरुन अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आऊटगोईंगवर भाष्य केलं आहे. मात्र हे वक्तव्य समोर येतं न येतंच तोच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य समोर आलं आहे. भाजपातले दुखावलेले नेते आपल्या संपर्कात आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपा आणि शिवसेना या पक्षातलं इनकमिंग वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेत जात आहेत. या नेत्यांममध्ये मधुकर पिचड, चित्रा वाघ, सचिन अहिर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आजच काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र या सगळया परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपातले दुखावलेले लोक माझ्या संपर्कात असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.