जिल्ह्याच्या दक्षिण भागात सलग नऊ दिवसांतच सरासरीच्या दीडपट ते दुप्पट पाऊस झाला. अकोले तालुका जिल्ह्यासाठी चेरापुंजी म्हणून ओळखला जातो. मात्र तेथे पावसाने सरासरीही गाठलेली नाही. जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहणारी सीना नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा तिच्या नदीपात्रातून ५० हजार क्युसेक पाणी वाहू शकते, परंतु पुरावेळी या नदीपात्रातून तब्बल दोन लाख क्युसेक पाणी वाहत होते.

यामुळे तिचे नदीपात्र एक कि.मी. रुंदावले होते. तब्बल ७२१ गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला. शेतीपिके पावसाच्या पाण्याखाली आणि शेतकऱ्यांच्या आसवांखाली बुडाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक माहितीनुसार केवळ पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांतील किमान १०० हून अधिक बंधारे, तलाव फुटले.

काही गावांच्या पाणी योजना वाहून गेल्या. पूल व रस्ते वाहून गेल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी किमान एक हजारावर लोकांचे तात्पुरते स्थलांतर केले. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख तीन हजार १०६ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका दोन लाख ८९ हजार ६०० शेतकऱ्यांना बसला. आतापर्यंत ३० टक्के क्षेत्रातीलच नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.