परभणी : जिल्ह्यामध्ये या खरीप हंगामासाठी ५ लाख ५६ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावर पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाखाली २ लाख ६६ हजार ८६० हेक्टरसाठी २ लाख १४५ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. तर कापूस पिकाखाली २ लाख ७ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रासाठी ११ लाख ४३ हजार ३६८ पाकिटांची गरज आहे. या दोन्ही पिकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा योग्य वेळी योग्य किंमतीत मागणीप्रमाणे मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर ९ अशी एकूण १० भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध असून, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह बियाणे खरेदी करा. अनोळखी व्यक्ती, दलाल यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.

बियाणे खरेदी करताना भेसळयुक्त बियाणे टाळण्यासाठी अधिकृत विक्रेते यांचेकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर बियाण्यांचा संपूर्ण तपशील म्हणजेच पीक, वाण, दर्जा, लॉट नंबर, कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेते त्यांचे नाव इत्यादी नमूद असावे. बियाण्याची पिशवी, टॅग, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे, अशाही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

भेसळीची शंका दूर करण्यासाठी पाकीट सीलबंद तथा मोहोरबंद असल्याची खात्री करावी. कापूस बियाण्याच्या अनुषंगाने एच.टी.बी.टी.ची खरेदी कोणत्याही अनोळखी व्यक्ती, दलाल, कृषी केंदचालक यांच्याकडून केली जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. विशिष्ट बियाण्यांचा काळाबाजार होण्याच्या पार्श्वभूमीवर कापूस बियाण्याच्या कोणत्याही विशिष्ट वाणाची मागणी न करता बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सरस वाणामधून बियाणे निवडून त्याची लागवड करावी, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा योग्य वेळी योग्य किंमतीत मागणीप्रमाणे मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर ९ अशी एकूण १० भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. निविष्ठा खरेदीच्या अनुषंगाने काही तक्रार, अडचण असल्यास आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, पंचायत समिती व संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.