दुधाला अनुदान आणि रास्त दर मिळण्याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील दूध संघाचे संकलन पूर्णपणे बंद ठेवणार आहे. ज्या दूध संघांना दुधाची वाहतूक करायची आहेत त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी कोल्हापूरात दिला.
राज्यातील दूध उत्पादकांना शासनाकडून न्याय मिळावा यासाठी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हास्तरीय दूध मेळावा घेण्यात आला होता. राज्याच्या सर्व भागात जिल्हास्तरीय मेळावे घेतले जाणार असून त्याची सुरुवात आज कोल्हापुरातून झाली. यावेळी १६ जुलैपासून दूध विक्री बंद आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना शेट्टी बोलत होते.
कर्नाटक, गोवा, केरळ राज्यात गाईच्या दूध विक्रीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सरकारकडून मिळते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही गाईच्या दूधावर तितकेच अनुदान द्यावे, या मागणीसाठी दूध विक्री बंद ठेवण्यात येईल, असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. दूध उत्पादकाला अनुदान मिळण्यासाठी ही आरपारची लढाई केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने प्रसिद्धीपुरती नसतात. यातून शेतकर्यांच्या पदरी काही ना काही दरवाढ पडलेली आहे. यामुळे हे आंदोलनही करो या मरोच्या भूमिकेतूनच करायचे आहे. या आंदोलनात विदर्भासह मराठवाड्यातील शेतकरीही सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २५ लाख लिटर दूध संकलित केले जाते, ते रोखण्यात येणार असल्याचे यावेळी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सांगितले.