अलिबाग – आंतर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असताना भाला लागून इयत्ता दहावीतील हुजेफा डावरे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी भाला फेक करणारा विधिसंघर्षित विद्यार्थी आणि स्पर्धेचे आयोजक यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
गोरेगावपासून जवळ असलेल्या पुरार गावाजवळ असलेल्या आयएनटी स्कूलच्या मैदानावर माणगाव तालुका माध्यमिक विभागाच्या वतीने शालेय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शाळेच्या बाहेरील मैदानावर विद्यार्थी भालाफेकचा सराव करत होते. यावेळी हुजेफा डावरे या विद्यार्थ्याला भाला डोक्यात लागून, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान राजाभाऊ मोने विद्यालयातील एक विधीसंघर्षित विद्यार्थी आणि आयएनटी अँकेडमी इंग्रजी हायस्कूल पूरार येथील स्पर्धा आयोजक कमिटी हे हुजेफा डावरे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे समोर आले. यानंतर स्पर्धा आयोजक कमिटी आणि भाला फेक करणारा विधीसंघर्षित विद्यार्थी यांच्या विरोधात भादवी कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.