Sudhir Mungantiwar vs Sanjay Rathod over Drain widening : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२ जुलै) तिसरा दिवस आहे. सभागृहात आज स्थगन प्रस्तावावर चर्चा पार पडली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासावेळी माजी मंत्री तथा भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून सरकारला प्रश्न विचारले. यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर मुनंगटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी देखील मंत्री राठोड यांना अपेक्षित उत्तर देण्यास सांगितलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “नाल्यांच्या योग्य नियोजनाअभावी नाल्यांशेजारी राहणाऱ्या वस्त्यांना फटका बसतो. नाल्यांची संरक्षक भिंत नियमांनुसार बांधली नाही, पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर त्या अभियंत्यांवर कारवाई करणार का? तसेच जिथे जिथे असे नाले असतील त्यांच्या दुरुस्तीबद्दल सरकारचं नियोजन काय?” यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड म्हणाले, “आम्ही अशा नाल्यांचं सर्वेक्षण करू. नाल्यांची रुंदी तपासू, ती वाढवावी लागेल का ते पाहू. भूमीअभिलेख विभागाकरवी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी करू. उर्वरित नाल्याचं बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू.”

सभागृहात नेमकं काय घडलं?

मंत्री राठोड यांचं उत्तर ऐकून मुनगंटीवार म्हणाले, “नाल्याची जितकी नैसर्गिक रुंदी आहे तितकीच राहिली पाहिजे याची खबरदारी शासन घेणार आहे का?” यावर मंत्री राठोड केवळ ‘सजेशन फॉर अ‍ॅक्शन’ (यावर विचार करू किंवा सल्ला ऐकला असून त्यावर कार्यवाही करू) एवढंच उत्तर दिलं. यावर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली.

“दादा कोंडकेंसारखं उत्तर देताय?”

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मंत्री राठोड आमचे मित्र आहेत. मात्र, नाल्याची नैसर्गिक रुंदी कायम राहील का असा माझा प्रश्न होता त्यावर त्यांनी ‘सजेशन फॉर अ‍ॅक्शन’ एवढंच उत्तर दिलंय. हे अ‍ॅक्शन, ओन्ली अ‍ॅक्शन, नो रिअ‍ॅक्शन असं असलं पाहिजे. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की नाल्याची नैसर्गिक रुंदी काय राहिली पाहिजे. त्यांच्याकडून हमी यायला हवी की नाल्याची नैसर्गिक रुंदी तशीच ठेवली जाईल. ती हमी न देता सजेशन फॉर अ‍ॅक्शन हे काय उत्तर आहे? हे तर द्वीअर्थी उत्तर झालं. हे काय दादा कोंडकेंचं उत्तर आहे? हे द्वीअर्थी आहे का? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.”

मुनगंटीवारांच्या नाराजीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय राठोड यांना सूचना केली की मुनगंटीवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपाययोजना करावी.