चंद्रकांत पाटलांच्या ‘घरी जाऊन स्वयंपाक करा’ टीकेनंतर मिळालेल्या पाठिंब्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुढारलेल्या…”

महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा,’ असे वक्तव्य पाटील यांनी केलेलं.

chandrakant patil supriya sule
सुप्रिया यांनी ट्विटरवरुन या प्रकरणासंदर्भात नोंदवली प्रतिक्रिया (फाइल फोटो)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सुळे यांच्याबाबत बोलताना वापरलेल्या भाषेवरून टीका होऊ लागताच पाटील यांचा सूर नरमल्याचं गुरुवारी दिसून आलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त करताना ‘सुप्रिया सुळे यांनी घरी जाऊन स्वयंपाक करावा,’ असे वक्तव्य पाटील यांनी बुधवारी केले होते. त्यावर बरीच टीकाटिप्पणीही झाल्यानंतर पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र आता या प्रकरणावरुन मिळत असणाऱ्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी आभार मानलेत.

नक्की वाचा >> “वहिनी कान्सला जातील आणि…”; सुप्रिया सुळेंना स्वयंपाक करण्याचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना महिला आणि बालविकास मंत्र्यांचा टोला

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या ज्यावरुन चंद्रकांत पाटलांनी टोला लागवलेला
‘‘दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला’’, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसेच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुळे यांनी म्हटले होते. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे हे जे सांगत आहे की मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यातही खोटेपणा आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

चंद्रकांत पाटील काय म्हणालेले?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे आम्हाला सांगितले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच ‘‘तुम्हाला मसण माहिती आहे ना’’, अशी विचारणाही पाटील यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केली.

टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण…
महाविकास आघाडी सरकार तिहेरी चाचणी पूर्ण करून ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू करीत नाही, याबाबत संताप व्यक्त करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ग्रामीण पद्धतीने बोललो, असे पाटील म्हणाले. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी सात्विक संताप व्यक्त केला, त्यामुळे समाजाला आनंदच वाटला. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही महिलेचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही. कोणीही पराचा कावळा करू नये, असे पाटील यांनी नमूद केले. आरक्षण देता येत नसल्यास महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरी जावे, असे पाटील म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी या वादावर पहिली प्रतिक्रिया काय दिली?
“काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन माझ्यासाठी ट्विट करणाऱ्या मला फोन करुन पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. पुढारलेल्या विचारांचा सक्षम देश घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही लैंगिक सामनेसाठी दिलेल्या समर्थनार्थ मी तुमचे आभार मानते,” असं ट्विट सुप्रिया यांनी केलंय.

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule first comment on chandrakant patil just go home and cook row scsg

Next Story
अविनाश भोसले: अभिनेत्री ॲंजेलिना जोलीचा पाहुणचार करणारा पुणेकर सीबीआयच्या ताब्यात; त्यांची आर्थिक भरभराट पाहून व्हाल थक्क
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी