राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा सुरु केला आहे. आता पवार कुटुंबाविषयी ज्या उलटसुलट बातम्या येत आहेत त्यावरुन सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली आहे. मागचं सव्वा वर्ष मी जे काही सहन केलं ते इतर कुणीतरी सहन करुन दाखवावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. भोर पुणे या ठिकाणी या असलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

“मी मागचं सव्वा वर्ष जे सहन करते आहे, ते इतर कुणी सहन करुन दाखवावं. माझ्या पोरांनाही सोडलं नाही. माझ्या पोरांचा राजकारणाशी काय संबंध? माझ्या मुलांना आणि नवऱ्याला प्रसिद्धी आवडत नाही. रोज आमच्या कुटुंबाबत बोललं जातं आहे, लिहिलं जातं आहे. आधी वाईट वाटायचं दीड वर्ष आमच्या घरात हे चाललं आहे. आज हे बोललात, आज ते बोललात याबाबत लिहिलं जातं.” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी खंत बोलून दाखवली.

बारामतीतल्या कार्यक्रमात पवार कुटुंबीयात दुरावा; ‘अशी’ होती सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची प्रतिक्रिया

आज काल मन मोकळं भाषणचं करू शकत नाही. कारण ते सगळं रेकॉर्डिंग करतात. मला काही भाजपाचे नेते भेटले होते, ते म्हणाले, काय केलंय तुम्ही पवार कुटुंबाने… एक दिवस असा जात नाही की तुमच्याबद्दल टीव्हीवर काही नसतं.आम्ही पॅकेज घेऊन थकलो आणि तुमचं मोफत चालू आहे. त्यामुळं आता सगळ्यांच्या घरात पोहचतोय, आपण असाच विचार करायचा. आम्हाला काय मजा येते का हे बघताना? कधी कधी मी माझ्या बहिणींना चिडवते. घरातले सगळे पुरुष दाखवत आहेत आमच्या, महिलांवर अन्याय होतोय. त्यांचेही फोटो लावा…अशी खुमासदार टिपण्णीही सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.