Suresh Dhas Meet CM Devendra Fadnavis : भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडचं प्रकरण उचलून धरलंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं असून त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचं पाठबळ असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. दरम्यान, आज सुरेश धस यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावं ही मागणी केली आहे. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आमदार सुरेश धस यांनी मला भेटून निवदेन दिलं आहे. त्यांच्या निवेदनानुसार त्यांनी हे प्रकरण उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही उज्ज्वल निकम यांना यासंदर्भात विचारलं. त्यांनी विचार करायला वेळ मागितला आहे. त्यानुसार ते अभ्यासानंतर निर्णय घेणार आहेत. त्यांनी होकार दिल्यास या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

बीड पोलीस ठाण्यात पलंग आणल्याच्या आरोपावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे बोललं जातं. पोलिसांनी स्पष्ट केलंय की अतिरिक्त पोलीस फौज आली आहे. त्यांना जमिनीवर झोपवायचं का? त्यांच्यासाठी पलंग आणले आहेत. कोणी म्हणतंय की एन्काऊंटर होणार.. पण ही प्रसिद्धीची हाव आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलंय.

हेही वाचा >> Suresh Dhas : “बिंदु नामावलीची बीड जिल्ह्यात वास्तुशांती…”, सुरेश धस यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठी मागणी

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस काय म्हणाले?

सुरेश धस म्हणाले, “बिंदु नामावलीची बीड जिल्ह्यात वास्तुशांती झाली आहे. बिंदु नामावलीमध्ये एसटी, एससीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आले आहेत. ओपन, मायक्रो ओबीसी, एससीबीसी अशा सगळ्याच जागेवर तेच लोक आले आहेत. एकाच प्रवर्गाचे लोक अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जास्त संख्येने झाल्याने बीड जिल्ह्यात कुठल्याही बाबतीत अडचण होऊ शकते. मी आता फक्त त्यांना हलवा म्हणतोय, भविष्यात केसदेखील दुसर्‍या जिल्ह्यात हलवण्याची पाळी येईल”, असेही सुरेश धस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh dhas meet cm devendra fadnavis asking to ujjwal nikam in beed case sgk