सातारा : फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण येथे मोठ्या जनसमुदायासह मोर्चा काढला. या वेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला व तपासी अधिकाऱ्यांना या आत्महत्येच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न विचारून धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी विशेष तपास पथकाची नव्हे, तर देखरेखीसाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक केली आहे. ही नियुक्ती आम्हाला मान्य नाही. या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी फलटण येथील मोर्चात केली.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या मृत्यूप्रकरणासंदर्भात आज (सोमवारी) सकाळी सुषमा अंधारे यांनी समर्थकांसह फलटणमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शहरातील थोर समाजसेवकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या मोर्चात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी उपस्थितांनी याप्रकरणी ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांना फाशी देण्याची मागणी केली. यानंतर तहसील कार्यालय येथून पायी चालत जात फलटण शहर पोलीस ठाणे गाठले. या वेळी प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. अन् पोलिसांवर हल्लाबोल करीत त्या डॉक्टर युवतीला न्याय देण्याची जोरदार मागणी केली. तसेच यासंबंधी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी केली.

या वेळी अंधारे यांनी तपासी अधिकारी, येथील यंत्रणा, तसेच फलटण शहर, ग्रामीण व लोणंद पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. तपासात कोणी अडथळे आणले, कोणी कोणी दबाव आणला, याची माहिती दिली. त्याचबरोबर या प्रकरणात कोण कोण राजकारण करत होते, कोणी कोणी तपासात हस्तक्षेप केला, त्याचबरोबर महिला डॉक्टर यांनी अनेक लेखी तक्रारी पोलीस ठाण्यात केल्या, तरीही याकडे दुर्लक्ष का केले याचे उत्तर द्या, अशी मागणी केली. तसेच, या प्रकरणात तपासी अधिकारी असलेले उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांना त्यांनी प्रश्न विचारले, की त्या डॉक्टर युवतीला अनेकांनी त्रास दिल्याचे सांगून त्या लोकांची नावे पुढे आलेली असताना, अद्याप चौकशीसाठी त्यांची नावे या गुन्ह्यात का घेतली नाहीत? या वेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांनी हा तपासाचा भाग असल्याने मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन अनेक आरोप केले. मोर्चाच्या वेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली.