उद्धव ठाकरेंच्या गटातील ९ खासदारांपैकी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्कें यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाणं आलं आहे. दरम्यान, म्हस्केंच्या या दाव्याला आता ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे. पण ते मंत्रिपद आपल्याला मिळावं यासाठी आदळआपट करुन, आक्रस्ताळे पणा करून किंवा काहीतरी न्यूजसेन्स व्हॅल्यू तयार करून लक्ष वेधण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्के यांच्याकडून सुरू आहे”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस यांची ‘एक्झिट’ नक्की, आता विनोद तावडे…”, सुषमा अंधारे यांचं सूचक विधान

पुढे बोलताना, “आपल्या मुलाला सोडून एकनाथ शिंदे नरेश म्हस्के यांना मंत्रिपद देतील, एवढं मोठं मन मुख्यमंत्र्यांचं नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगवला. तसेच “ ”नरेश म्हस्के हे खासदार झाल्यानंतर बुध्दीची पातळी वाढली असेल असं मला वाटलं होतं, पण त्यांचा थिल्लरपणा अजूनही गेलेला नाही”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले होते?

“नरेश म्हस्केंनी यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे, असा दावा केला होता. दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. मतदारसंघात कामं झाली पाहिजेत ही त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी मोदींना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मुल्ला मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही. असं या खासदारांनी सांगितलं आहे”, असे म्हस्के यांनी म्हटले होते.

हेही वाचा – “मविआचे १८ खासदार जिंकले, तर राजकारणातून संन्यास घेईन”, आशिष शेलार यांच्या विधानाची आठवण करून देत अंधारेंची टीका

पुढे बोलताना, “या खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाईचा धोका आहे. त्यासाठी या दोन खासदारांनी योजनाही तयार केली आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आमि लवकरात लवकर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना आम्ही पाठिंबा देऊ असं या दोघांनी सांगितलं” असा दावाही त्यांनी केला होता.