सांगली : मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एक संशयिताला अटक करण्यात आली असून बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी दुसऱ्या गटातील १३ जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. सध्या शहरातील स्थिती नियंत्रणात असून सर्वत्र शांतता आहे. बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. समाज माध्यमावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यावर सुद्धा कारवाई होणार असल्याचे घुगे म्हणाले.
घुगे म्हणाले, मिरजेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका संशयितविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. तर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी दुसऱ्या गटातील १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयितांची ओळख निश्चित करण्यात आली असून यापैकी तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच समाज माध्यमावर आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक घुगे यांनी दिली आहे.
दरम्यान, बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक घुगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. बैठकीला आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नाईकवडी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपाध्यक्ष प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, अय्याज नाईकवडी, विकास सूर्यवंशी, नितीन चौगुले, राजेश देशमाने, मकरंद देशपांडे, मैनुद्दीन बागवान, राजेंद्र शिंदे, विलास देसाई, मोहन वाटवे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील नदीवेस भागात मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. या वेळी दोन तरुणांमध्ये एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये होत वाद घडला. याचे पडसाद लगेच उमटत जमाव एकत्र आला. एकत्र आलेल्या तरुणांच्या गटाने संशयित तरुणाच्या घरावर दगडफेक केली. संतप्त झालेला हा जमाव पोलीस ठाण्यात जात त्याने संबंधित संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली. यातूनच काही तरुणांनी मार्केट परिसरात दुचाकीवरून फिरत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यामुळे मार्केट परिसरात असणाऱ्या खाद्यविक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. या जमावाने मार्केट परिसरातील अनेक फलकांची नासधूस केली. या दरम्यान, शास्त्री चौकातील फलकांचीही मोडतोड झाली. यातून वातावरण पुन्हा तणावाचे झाले होते.