राहाता : कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात, न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत आरोपी विनोद शिवाजी पाटोळे (वय ४०, रा. समतानगर, कोपरगाव) यांच्या नातेवाईकांनी या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विनोद पूर्णपणे निरोगी होता. तुरुंगात त्याचा मृत्यू कसा झाला? हे प्रशासन सांगणार का? या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे.
आरोपी विनोद शिवाजी पाटोळे याला बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) प्रकरणात अटक करण्यात आली होती. नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याने त्याला कोपरगावच्या दुय्यम कारागृहात ठेवण्यात आले होते. काल, सोमवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास पाटोळेची प्रकृती अचानक बिघडल्याने तातडीने त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा होणार आहे. घटनेची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपविभागीय अधिकारी आमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोपरगाव दुय्यम कारागृहाच्या सुरक्षा, आरोग्य तपासणी प्रणालीवर आणि अंतर्गत व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आरोपीचा कारागृहात मृत्यू झाल्याने या प्रकरणाची न्यायालयीन व राज्य गुन्हा अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.