नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीत यंदा नवीन प्रयोग राबवला आहे. ९९ टक्के विद्याशाखांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्यात येत आहेत. सुरक्षितता आणि अचूकतेला प्राधन्य देत निकाल लावण्यात तत्परता साध्य करण्यासाठी हा प्रयोग असल्याचे परीक्षा नियंत्रक खुशालसिंग साबळे यांनी सांगितले.
एम.एससी आणि एम.ए. हे दोन अभ्यासक्रम वगळता उर्वरित सर्व विद्याशाखांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याची सुरुवात स्वारातीम विद्यापीठाने केली आहे. असा प्रयोग राबवणारे स्वा.रा.ती.म विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ असून येत्या हिवाळी परीक्षांपर्यंत १०० टक्के विद्याशाखांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बी.ए., बी.काॅम., एम.काॅम., बीएससी, फार्मसी, बीसीए, बीबीए, बी.पीएड, डी.एड. अशा सर्व विद्याशाखांचा यात समावेश आहे.
स्वारातीम विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अर्थात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व विद्याशाखांच्या एकूण १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या एकूण उत्तरपत्रिकांची पाने सुमारे ८ लाखांच्या वर होतात. काही उत्तरपत्रिका २४ पानांच्या तर काही ३२ पानांच्या आहेत. या सर्व पानांचे स्कॅनिंग करण्याची जबाबदारी एका संस्थेला दिली होती. स्कॅनिंग असे करण्यात आले की, तपासणाऱ्यांना उत्तरपत्रिका कोणत्या महाविद्यालयाची आहे, कोणत्या विद्यार्थ्याची आहे, हे कळत नाही. यामुळे गैरप्रकाराला संधी शिल्लक राहिलेली नाही, असा दावा करण्यात आला.
पूर्वी नियोजित ठिकाणी उत्तरपत्रिका संकलित करणे, त्यासाठी वाहतूक, त्या तपासणाऱ्यांना पाचारण करणे, त्याचे भत्ते, वेळ या सर्व प्रकारांना फाटा बसला आहे. शिवाय अचूकतेत भर पडली आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत चार जिल्ह्यांत एकूण ९० मूल्यांकन केंद्र आहेत. त्या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीची सोय उपलब्ध आहे. यासाठी एकच सर्व्हर असून याद्वारे सर्व ठिकाणी नियंत्रण ठेवता येते, असेही साबळे यांनी सांगितले.
पुनर्तपासणी सोपी
निकाल लागल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला मिळालेल्या गुणांबद्दल संशय असल्यास तो पुन्हा तपासणी करण्याची मागणी करतो. पूर्वी ही प्रक्रिया किचकट होती. पण, आता ऑनलाइन पद्धतीमुळे अवघ्या पाच मिनिटांत संबंधित उत्तरपत्रिका संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देता येणार आहे.