Tanaji Sawant angry on farmers : वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांनी आता आणखी एक वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात हा प्रकार पाहायला मिळाला. “सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत”, असं म्हणत सावंत यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला. डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांची संवाद साधत होते. तेव्हा काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत काही प्रश्न विचारले. त्यावर सावंत यांनी संताप व्यक्त केला
तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही”.
शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताच सावंत म्हणाले, ”आम्हालाही कळतं कोणाची तरी सुपारी घ्यायची, इथे उभं राहून बोलायचं आणि चांगल्या कामात मिठाच्या खडा टाकायचा. आम्हीही उडत्याची मोजतो. प्रत्येकाने आपापल्या औकातीत राहून बोलायचं. औकातीत राहून विकास करून घ्यायचा”.
हे ही वाचा >> Babanrao Shinde : शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांच्या आमदाराची निवडणुकीतून माघार? माढ्यात काय शिजतंय?
तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कसा सुटणार? सावंत म्हणाले…
सावंत यावेळी म्हणाले, आपल्या भूम परांडा वाशी साठी अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय म्हणजे आपल्या हक्काचे पाणी… आपल्या सततच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत, उजनीचे पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात आणण्यासाठी बोगद्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही तातडीने पूर्ण करून साधारपणे गुढीपाडव्यापर्यंत हे पाणी सीना कोळेगाव धरणात येईल.
हे ही वाचा >> Nitin Gadkari : “मागल्या जन्मी पाप करणारा या जन्मी साखर कारखाना काढतो किंवा…”, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
सावंत यांनी डोंगरवाडी गावातील बैठकीनंतर फेसबूकवर एक पोस्ट लिहून या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, विविध विकास कामांच्या भूमिपूजन व विविध योजनेचा लाभ वाटपाच्या अनुषंगाने मतदारसंघातील विविध गावांच्या दौऱ्यावर असताना ज्या ज्या गावात गेलो त्या गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल महिलांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आभार मानले. तसेच प्रत्येक गावांमध्ये माझ्या भगिनींनी मला राखी बांधून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे व प्रमुख जिल्हा पदाधिकारी देखील उपस्थित होते
© IE Online Media Services (P) Ltd