इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामधील जगातील आघाडीची ऑटो कंपनी टेस्लाने अखेर भारतात पदार्पण केलंय. टेस्लाने भारतातील आपल्या व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली आहे. बहुचर्चित टेस्ला कंपनी महाराष्ट्राऐवजी बेंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टेस्ला टीमशी झालेल्या चर्चेत आदित्य ठाकरेंनी टेस्लाला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तसेच केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन हे निमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती. आदित्य ठाकरेंच्या त्याच ट्विटला रिप्लाय देताना संदिप देशपांडे यांनी, “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असं ट्विट करत आदित्य यांना लक्ष्य केलं.
टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका” बोलाची कढी बोलाचा भात” pic.twitter.com/tvtD9CJLXT
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 13, 2021
आणखी वाचा- “भारतात पाऊल ठेवण्यासाठी Tesla ने 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आज…”
दरम्यान, टेस्ला कंपनीने टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (Tesla Motors India and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) नावाने बेंगळुरूमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे. यासोबतच कंपनीने तीन डायरेक्टर्सचीही नियुक्ती केली आहे. टेस्ला भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेईल.
