Raj Thackeray And Shankaracharya Avimukteshwaranand Comments: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यांवरून विविध वाद झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन याविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता.
दरम्यान, सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, “प्रत्येकाला मराठी यायला हवी, यात काही वाद नाही. पण विनाकारण कोणालाही मारहाण करू नका आणि जर कोणी जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा अशी कोणती गोष्ट कराल, तेव्हा त्याचे व्हिडिओ काढू नका.”
आज शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या या विधानावर टिप्पणी केली आहे. टीव्ही ९ शी बोलताना ते म्हणाले, “दोन्ही भाऊ एकत्र आले आणि मराठी अस्मितेसाठी आवाज उठवला, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात थोडी चूक केली. मारहाण करायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांची मोहीम एकप्रकारे कमजोर झाली. संपूर्ण देशातून टीका होऊ लागली. कार्यकर्ते उत्साहात चूक करतच होते आणि त्यांच्या नेत्यांनीही चुकायला सुरुवात केली. सभेत म्हणू लागले की, मारहाण करा आणि मारहाण केल्यानंतर याचे पुरावे सोडू नका. यामुळे त्यांची ही मोहीम कमजोर झाली आहे.”
दरम्यान, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दोन दिवसांपूर्वीही मराठी-हिंदी वाद आणि ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, “मराठीला कानशिलात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळणार आहे का? हिंदी ही राजभाषा आहे, तिचा प्रोटोकॉल असतो.”
ते पुढे म्हणाले होते की, “ठाकरेही महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते. ठाकरे मगधमधून आले होते. त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत.”