गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल (८ सप्टेंबर) रात्री सरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळात बैठक झाली. दोन-अडीच तास चाललेल्या या बैठकीनंतर एक बंद लिफाफा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जून खोतकर यांच्याकडे पाठवला. त्यामुळे, आज मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतील, असं वाटलं होतं. परंतु, त्यांनी उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी गावात सुरूअसलेल्या उपोषणस्थळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकार आणि मराठा समाजातील शिष्टमंडळ यांच्यात काल (८ सप्टेंबर) दीर्घकाळ बैठक झाली. या बैठकीतून तोडगा निघाला असेल अशी आशा व्यक्त केली जात होती. दरम्यान, अर्जुन खोतकर बंद लिफाफा घेऊन उपोषणस्थळी पुन्हा दाखल झाले. हा लिफाफा मनोज जरांगे पाटलांनी उघडून पाहिला. परंतु, मनोज जरांगे पाटलांनी सुचवलेल्या दुरुस्त्या या अहवालात नव्हत्या. त्यामुळे सरकारच्या जीआरमध्ये दुरुस्ती होणार नाही तोवर आमरण उपोषण सुरूच राहणार अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.

हेही वाचा >> “माझ्या शब्दापुढे मराठा समाजाने जाऊ नये, कारण…”, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

मनोज जरांगे म्हणाले, “२००४ च्या जीआरचा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. ७ सप्टेंबरच्या शासन आदेशात सुधारणा झाली नाही. फेऱ्या होऊ द्या, मीही इथे झोपलेलोच आहे. सरकारने अर्जून खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला. मात्र, त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरू राहील.”

“अर्जून खोतकर आमची भूमिका सरकारला कळवतील आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. उग्र आंदोलनाला या आंदोलनाचा पाठिंबा नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

संपूर्ण महाराष्ट्राला फायदा द्या

““मनपरिवर्तन करा, मतपरिवर्तन करा. कोणाच्याही विरोधात बोलू नका. आपण शांततेत आंदोलन करायचं, उग्र कोणीही करायचं नाही, ही महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती आहे. मराठा समाजातील जनतेला हात जोडून विनंती आहे की मी जो हा लढा लढतोय, मी अखंड महाराष्ट्रासाठी आरक्षण द्यावं ही मागणी करतोय. समज-गैरसमज ठेवण्याचं कारण नाही. मराठवाड्यात फायदा द्या, महाराष्ट्रालाही फायदा द्या. सरकसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, किंवा २००४ जीआरमध्ये तातडीने दुरुस्ती करा आणि प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजेत”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“आपल्या ठरल्याप्रमाणे सरकारने जीआर आणलं तर उद्या सकाळी सूर्य उगवण्याआधी पाणी पिणार, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. हे आमरण उपोषण सुरूच राहिल, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा लढा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेने आंदोलन करावं, माझ्या शब्दाच्या पुढे मराठा समाजाने जाऊ नये. मी तुमच्यापेक्षा मोठा नाही पण मुलगा म्हणून ऐका, कारण आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपण खांद्यावर घेतली आहे”, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no solution manoj jarange patils hunger strike will continue insist on gr amendment sgk