विधिमंडळाच्या येत्या १० डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची नागपुरात तयारी सुरू झाली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मंत्रालयाचे कर्मचारी आणि अधिवेशनाच्या कामकाजाची कागदपत्रे नागपुरात येण्याचे संकेत मिळाले आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने सिव्हिल लाईन्स, रविभवन परिसरातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे बंगले तसेच आमदार निवास, सुयोग, नागभवन, सरपंच भवन, हैदराबाद हाऊस, अधिवेशन काळात वापरली जाणारी संबंधित कार्यालये आणि इमारतींची रंगरंगोटी आणि दुरुस्ती सुरू झाली आहे. अधिवेशन काळातील सुरक्षेच्या कारणाने आमदार निवास आणि रविभवनातील आरक्षण तातडीने बंद करण्यात आले असून अधिवेशन संपेपर्यंत आरक्षण दिले जाणार नाही.
यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात आल्याने सरकारी कर्मचारी दिवाळीत व्यस्त आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे महिनाभर आधीपासून सुरू होणारी तयारी यंदा काही दिवस लांबली. त्यामुळे दिवाळी आटोपताच तयारीला आणखी वेग येईल. अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्र्यांपासून ते शेकडो अधिकारी, कर्मचारी नागपुरात मुक्कामास राहणार असल्याने त्यांच्या दिमतीसाठी यावेळी २११८ वाहनांची मागणी नागपूर, अमरावती, नाशिक आणि औरंगाबाद कार्यालयाकडे नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी नोंदण्यात येणाऱ्या मागणीची पूर्तता होत नाही आणि वाहनांची संख्या कमी पडते असा अनुभव आहे. अधिवेशन काळात दरदिवशी १४०० सरकारी वाहने नागपुरात फिरत असतात. यावेळी ही संख्या वाढेल असा अंदाज आहे.
यंदा सिंचन, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्री, अधिकाऱ्यांना लागणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक राहणार आहे. सिंचन घोटाळ्याचे मोठे पडसाद अधिवेशनात उमटणार असल्याने सिंचन खाते तसेच जलसंपदा आणि जलस्रोत खात्याच्या सर्वच बडय़ा अधिकाऱ्यांना अधिवेशन काळात नागपुरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या २५ नोव्हेंबरपासून नागपुरात वाहनांचे आगमन सुरू होईल, असे समजते. अधिवेशन काळात मोठय़ा प्रमाणावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असल्याने पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाचे शिपाई तसेच वाहन चालक मोठय़ा संख्येने नागपुरात मुक्कामास राहतील, त्यांच्यासाठी तंबू उभारणी आणि इमारती भाडय़ाने घेणे सुरू झाले आहे. सरकारी कर्मचारी, पोलीस यांच्या भोजनव्यवस्थेसाठी कंत्राटे देण्यात आली आहेत. त्यासाठी लागणारी भांडी-कुंडी, बिछाने, अंथरूण यांचेही ऑर्डर्स नोंदविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील हिवाळी अधिवेशन गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्र्यांविना राहणार आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने यावर्षीचे अधिवेशन उपमुख्यमंत्र्यांशिवाय खेचून नेण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे. नागपूरच्या अधिवेशनात छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, आर.आर. पाटील या उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ गाजविले आहे.  

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tight security for winter session