अकोले : गावरान बियाणे जतन व संवर्धनाच्या कार्यातून बीजमाता म्हणून ओळख मिळविलेल्या राहीबाई पोपेरे यांनी दिवाळीचा सण साजरा करीत असतानाही बियाणांची, निसर्गाशी असणारे आपले नाते जपले. पारंपारिक पद्धतीबरोबरच विशेष पद्धतीने दिवाळी साजरी करीत आपल्या ध्येयाशी असणारी एकनिष्ठा दाखवून दिली.

दिवाळी सणाच्या निमित्ताने घरोघरी लक्ष्मीचे पूजन होते. दारोदारी सडा रांगोळ्या घातल्या जातात. रोषणाई केली जाते. पणत्यांची घरदार उजळून निघते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित राहीबाई पोपेरे यांनीही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला पण हटक्या पद्धतीने.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे हे राहीबाई यांचे गाव. सह्यादीच्या डोंगररांगेत बसलेले. दिवाळीचा सण साजरा करीत असताना आपला गावरान बियाणे जतन संवर्धनाचा वसा त्या विसरल्या नाहीत.

दारी दिवे लावलेच पण त्या बरोबरच पूजा करीत असताना शेतात नुकत्याच तयार झालेल्या विविध वाणांच्या बियाणांची सुंदर सजावट त्यांनी केली होती. दारावर तोरण बांधले तेही भाताच्या लोंब्यांचे. लक्ष्मी पूजनासाठी नागली, वरई, खुरासणी व इतर भाजीपाल्याचे बियाणे सुरेख पद्धतीने मांडलेले होते.

पूजेसाठी उत्कृष्ट पद्धतीने गावठी बियाणांची मांडणी केलेली होती. आपल्या कार्याशी आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहून एखादा सणही कसा साजरा करावा याचे. उदाहरणच त्यांनी दाखवून दिले. याप्रसंगी त्यांनी देशवासीयांना तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनाही त्यांनी दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शाळेची पायरीही कधी न चढलेल्या राहीबाई निसर्गाच्या शाळेत शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना बियाणे गोळा करण्याची, त्याची आपले शेतात लागवड करण्याची आवड होती. त्यांनी मोठ्या प्रमाणात विविध वाणांचे गावरान बियाणे गोळा केले. त्यातूनच गावरान बियाण्यांच्या बीजबँकेचा जन्म झाला. आज कोंभाळणे येथील त्यांच्या या बीजबँकेत ५४ पिकांचे सव्वाशेच्या आसपास वाण आहेत. त्यांच्याकडे वाळचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचे कार्य पाहून एका कार्यक्रमात त्यांचा “सीड मदर” असा उल्लेख केला होता. तेव्हापासून त्या बिजमाता म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. गावरान बियाणे जातनाचे त्यांच्या कामामुळे केंद्र सरकारने २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.

कळसूबाई परिसरातील जैवविधता जपण्यासाठी त्यांनी कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन समिती स्थापन केली आहे. गावरान बियाणांचे जतन संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांनी परसबागेची चळवळ सुरू केली.कळसूबाई परिसरात अनेक परसबाग मोठ्या प्रमाणात गावरान बियाणे तयार होत असते.

त्यांच्या बियाणे बँकेला भेट देण्यासाठी विद्यार्थी, संशोधक, शेतकरी, पर्यटक येत असतात. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीसारखे राष्ट्रीय सण असो वा पारंपरिक सण उत्सव असो त्यावेळी गावरान बियाणांचा वापर करून त्या आपल्या घरापुढे सुरेख रांगोळ्या काढत असतात. रक्षाबंधनाच्या काळात बियाणांचा वापर करून आकर्षक राख्या बनवितात. राज्यभर विविध शाळा, महाविद्यालयात व्याख्याने देण्यासाठी त्यांना आवर्जून बोलावले जाते.