​सावंतवाडी : सावंतवाडी- बेळगाव आणि कोल्हापूर मार्गावर आंबोली घाटातील कुंभेश्वर येथील मुख्य महामार्गावर आज सकाळी एक मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बाजूने वाहनांची मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

​आज स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. झाड कोसळल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे काही तासांनंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली.