IAS Pooja Khedkar : ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून यूपीएससी परीक्षेत यश मिळविणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर खेडकर यांनी स्वतंत्र कक्षाची मागणी, स्वतःच्या आलिशान गाडीला अंबर दिवा लावणे, वरिष्ठांचा कक्ष ताब्यात घेणे यासारख्या गोष्टी केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांनी एमबीबीएस च्या प्रवेशासाठीही ओबीसी नॉन क्रिमिलियेर कोट्याचा वापर केल्याची बाब समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा खेडकर यांनी २००७ साली पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसी भटक्या जमाती-३ या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता. हा प्रवर्ग वंजारी जातीसाठी राखीव असून त्या याच प्रवर्गातून येत असल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला दिली. २०११-२०१२ या वर्षात पूजा खेडकर यांनी एमबीबीएसच्या प्रवेशासाठी ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून प्रवेश घेतला होता. त्यावेळी त्यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते.

हे वाचा >> IAS Pooja Khedkar Family ties Pankaja Munde : आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी संबंध? १२ लाखांचा धनादेश…

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, पूजा खेडकर यांनी त्यावेळी प्रवेश परीक्षेत २०० पैकी १४६ गुण मिळवत खासगी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. त्यावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही परीक्षा घेतली जात नव्हती. पूजा खेडकर यांच्या दहावी आणि बारावीच्या गुणांचीही माहिती इंडिया टुडेने दिली आहे. शालेय नोंदीनुसार त्यांना दहावीला ८३ टक्के तर बारावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळाले होते.

पूजा खेडकर प्रकरण काय?

पूजा खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांची बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रवर्गातून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे.

नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे, अशी अट आहे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची ४० कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे दाखवले. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबत बरीच माहिती समोर आणली होती.

हे ही वाचा >> IAS Pooja Khedkar Property : पूजा खेडकर यांची डोळे दिपवणारी संपत्ती; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता, आलिशान गाड्या, सोन्याचे घड्याळ

पूजा खेडकर यांची संपत्ती किती?

  • IAS पूजा खेडकर यांच्याकडे ११० एकर शेतजमीन असल्याचे समोर आले आहे.
  • तसेच सहा प्लॉट्स आणि ७ फ्लॅट आहेत.
    ९०० ग्रॅम सोनं आणि हिरे आहेत.
  • त्यांच्याकडे १७ लाख रुपयांचे सोन्याचे घड्याळ आहे.
  • ऑडीसह चार आलिशान गाड्या आहेत. तसेच दोन खासगी कंपन्यात त्यांची भागीदारी आहे.
  • त्यांच्याकडे एकूण १७ कोटींची मालमत्ता आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trainee ias officer puja khedkar used obc quota for mbbs admission as well says sources kvg