लोकसत्ता वार्ताहर
कराड : सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १८ वा सिझन सुरू आहे. या टी ट्वेंटी आयपीएल क्रिकेट मॅचच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीसाठी सट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून सदर गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून या प्रकरणातील साखळीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले असून त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केले आहे.
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील या धडक कारवाईत संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासाो कटरे (दोघे रा. कराड) अशी आयपीएल सट्टा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कराडमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘आयपीएल’वर सट्टा लावला जात आहे. वेळोवेळी पोलिसांनी या सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. मात्र, तरीही दरवर्षी ‘आयपीएल’ सुरू होताच शहरात सट्टा लावण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच गत काही दिवसांपासून शहरात काहीजण ‘आयपीएल’वर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस सट्टेबाजांचा शोध घेत होते. खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासाो कटरे (दोघे रा. कराड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईने बेकायदा धंदेवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली आहे.
सट्टेबाजारातील साखळीचा शोध घेण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तसेच कोणाच्या वरदहस्ताखाली सट्टेबाजार चालविला जातो, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांकडून गोपनीयरीत्या तपास केला जात आहे. त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले असून, त्याठिकाणी छापासत्र सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd