बीड : बीड जिल्ह्यात एकाच रात्री दोन दरोडे टाकण्यात आले. वडणवी तालुक्यातील काडगाव येथे लग्नघरी टाकलेल्या दरोड्यात ११ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला, तर बीड तालुक्यातील कॅनरा बँकेच्या पाली शाखेतून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास १२ इंची भिंतीला यंत्राने फोडून दरोडेखोरांनी १८ लाख रुपयांची रोकड लंपास केली.
वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे बबनराव धुराजी मांजरे यांच्या घरावर अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून चाकूचा धाक दाखवत घरातील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव मांजरे यांच्या कवडगाव येथील घरात अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी प्रवेश करून, त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून पैसे व सोन्याची मागणी केली. चोरांनी लोखंडाच्या गजाने कपाटाचे कुलूप तोडून रक्कम ४० हजार रुपये, मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले एक लाख रुपयांचे सोने असा एकूण ११ लाख २० हजार ८०० रुपयांचा ऐवज पळवून नेला. वडवणी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अन्य एका घटनेत बीड तालुक्यातील पाली गावात कॅनरा बँकेच्या शाखेतून दरोडेखोरांनी जवळपास १८ लाखांची रोकड लंपास केली. बँकेच्या पाठीमागील असलेली १२ इंच भिंत फोडून रक्कम पळविण्यात आली. दरम्यान, पाली गावात बँकेत सात सुरक्षा कॅमेरे होते. एकही सुरक्षा गार्ड नसल्याने ही चोरी सहजपणे करण्यात आली.
