केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांमुळेच आज मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होता. त्यावरून काँग्रेससह विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटानेही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. कश्मीर-लडाखपासून अरुणाचल-मणिपूरपर्यंत खदखद व हिंसाचार सुरूच असला, तरी भारतीय नीरोचे बासरीवादन सुरूच आहे, अशी टीका ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केली आहे.

नेमकं काय म्हटलंय ठाकरे गटाने?

“मोदी म्हणतात त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमधील परिस्थिती सुधारली असेल तर मग देशात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडत असला तरी मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता का आहे? राजकीय पक्ष, उमेदवार उघडपणे प्रचार करायला का धजावताना दिसत नाहीत? उमेदवार स्वतःची पोस्टर्स का लावू शकलेले नाहीत? पंतप्रधान मोदींकडे यापैकी एका तरी प्रश्नाचे उत्तर आहे का? आधी ते द्या आणि मग मणिपूरमध्ये नसलेल्या शांततेचे श्रेय लुटा”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – “राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

“…तरीही भारतीय नीरोचे बासरीवादन सुरूच”

“कश्मीर, लडाखपासून अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरपर्यंत खदखद आणि हिंसाचार सुरूच आहे, तरीही भारतीय नीरोचे बासरीवादन सुरूच आहे. पंतप्रधानांचा हा दावा म्हणजे कांगावा तर आहेच, परंतु हिंसाचारग्रस्त मणिपुरी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रकार आहे. मोदी यांच्यावर खोटारडेपणाचे आरोप सातत्याने का होतात, हे त्यांच्या या बेधडक दाव्यावरून लक्षात येते”, असेही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा – विश्लेषण : रोम जळत असताना राजा नीरो खरंच Fiddle वाजवत बसला होता का?

“मणिपूर जळत असताना मोदी मौन होते”

“मणिपूर हे राज्य मागील वर्षभर जातीय आणि वांशिक हिंसाचाराच्या वणव्यात जळत आहे. शेकडो निष्पाप लोकांचे बळी या हिंसाचाराने घेतले. हजारो कुटुंबे बेघर झाली. स्थलांतरित झाली. ईशान्य सीमेवरील अत्यंत संवेदनशील असलेले हे राज्य सलग काही महिने जळत असताना पंतप्रधान मोदी, त्यांचे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार काय करीत होते? आज मोदी ‘वेळीच हस्तक्षेप’ केल्याच्या बढाया मारीत असले तरी त्या संपूर्ण काळात मोदी सरकारची अवस्था कळूनही वळत नाही’ अशीच होती. रोम जळत असताना नीरो जसा बासरी वाजवीत बसला होता, तसे पंतप्रधान मोदी मणिपूर जळत असताना मौन बाळगून होते”, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली.