तौते चक्रीवादळाच्या तडाख्याने कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या वेगवान दौऱ्यावरून भाजपानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निशाणा साधला आहे. “खरंच बेस्ट सीएम आहेत,” असं म्हणत मनसेनं मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौतेमुळे नुकसान झालेल्या कोकणचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चार तासांच्या दौऱ्यावरून विरोधीपक्ष भाजपाने निशाणा साधला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या धावत्या दौऱ्यावरून टोला लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.

“मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कोकणाची थट्टाच

“शिवसेना आणि सरकारला भरभरून देणाऱ्या कोकणच्या तोंडाला संकट काळात मुख्यमंत्र्यांनी पाने पुसण्याचेच काम केले आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले, मात्र चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोललेच नाही. निसर्ग वादळात अनेक घोषणा झाल्या, मात्र आपदग्रस्तांच्या हाती काही आले नाही. हेक्टरी पैसे दिल्याने ५००रु प्रतिझाड एवढीच मदत शेतकऱ्यांना मिळाली. ही एक प्रकारे कोकणवासीयांची थट्टाच आहे,” असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray kokan tour mns leader sandeep deshpande cyclone tauktae bmh