पंढरपूर : आजकाल सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. दुग्धोत्पादनातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर क्रांती घडवेल, असे मत पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी काढले. पशुपालक व पशुवैद्यक क्षेत्र आणि सकारात्मक बदलांचा फायदा होऊन भविष्यात क्रांती होऊ शकते, असेही ते म्हणाले.

तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात ‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त स्वेरी व ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ‘तांत्रिक परिसंवादा’च्या उद्घाटन प्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे हे मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे होते. या वेळी माजी सहआयुक्त डॉ. महेश बनसोडे, माजी सहा. संचालक डॉ. चंद्रहास कापडी, डॉ. मंगेश घाडीगावकर, जिओ प्लॅटफॉर्मचे महाव्यवस्थापक डॉ. संतोष वाघचौरे, पुणे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, सातारा उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सोलापूरचे उपायुक्त डॉ. विशाल येवले, सांगलीचे सहा. आयुक्त डॉ. विजय ढोके, कार्यक्रमाचे संयोजक व ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. मुकणे म्हणाले की, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे दुभत्या गाई-म्हशींचे आरोग्य सदृढ बनते. दुग्ध मशीनने धारा काढणे, माज ओळखणे, कृत्रिम रेतनाची वेळ सुनिश्चित करणे, दुधानुसार आहार वितरण, गोठ्याचे नियंत्रण इत्यादी बाबी सुलभ होऊन दुग्धोत्पादन फायदेशीर करता येतील.

स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर यांच्या स्मरणार्थ असलेले ‘उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ हे हातकणंगले (जि.कोल्हापूर) मधील डॉ. सत्यदीप चिकबिरे, सांगलीतील डॉ. अविनाश चव्हाण, साताऱ्यामधील डॉ. दत्तात्रय लोखंडे, करमाळा (सोलापूर) मधील डॉ.मनिष यादव, पंढरपुरातील डॉ. राजेंद्र सावळकर, केडगाव (जि.पुणे) मधील डॉ. चैत्राली आवाड व मोहोळ (जि.सोलापूर) मधील डॉ. प्रदीप रणवरे यांना २०२४ मध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

यावेळी स्वर्गीय डॉ. सुहास देशपांडे जीवनगौरव पुरस्कार माजी सहसंचालक डॉ.सी.आर. कापडी यांना प्रदान करण्यात आला. त्यांचे वय ८६ वर्षे आहे, मात्र त्यांनी प्राणी सेवा ६३ वर्षे केली. यातून त्यांचे प्राणिमात्रावर असलेले निस्सीम प्रेम दिसून येते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश बनसोडे यांनी केले तर डॉ. अनिल सरदेशमुख यांनी आभार मानले.