लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : चांदोली धरणालगत असलेल्या वारणावती वसाहतीमध्ये रविवारी रात्री ६० ते ७० किलो वजनाच्या अजगराला प्राणिमित्रांनी ताब्यात घेऊन वनजीव विभागाच्या ताब्यात दिल्याने वारणावती वसाहत निर्धास्त झाली. तर सांगलीपासून हाकेच्या अंतरावर कर्नाळ-नांद्रे रस्त्यावर बिबट्याचा वावर लोकांच्या नजरेत आल्याने वन्य प्राण्यांची दहशत कायम आहे.

वारणावती करमणूक केंद्रालगत काही दिवसांपासून मोठा अजगर वारंवार लोकांच्या दृष्टीस पडत आहे. रविवारी रात्री साडेआठच्या दरम्यान याचे काही तरुणांना पुन्हा दर्शन झाले. त्यांनी तत्काळ सर्पमित्र संग्राम कुंभार यांना कळवले. त्यांनी व वन्यप्राणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर अजगरावर ताबा मिळवला. ११ फूट लांब व ६० ते ७० किलो वजनाचा अजगर ताब्यात घेऊन वन विभागाने नैसर्गिक अधिवासात त्याची मुक्तता केली.

आणखी वाचा-कोकरूडला पाच वेळा निधी मिळूनही चार दिवसांतून एक वेळ पाणी कसे?, मानसिंगराव नाईकांची सत्यजित देशमुखांवर टीका

दरम्यान, कर्नाळ-नांद्रे मार्गावर उसाच्या एका बिबट्याचे दर्शन काही वाहनचालकांना झाले. त्यांनी याचे मोबाईलवर चित्रीकरणही केले. तसेच नवीन झालेल्या पुलाजवळ दोन महिलांनाही बिबट्या दिसला. याची माहिती वन विभागाला मिळताच वनपाल तुषार भोरे यांनी अन्य सहकार्यांच्या मदतीने या परिसराची पडताळणी केली असता पाउलखुणा आढळून आल्या. गस्त दरम्यान वन कर्मचाऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले. बिबट्या नावरसवाडी ओढा पात्रालगत असलेल्या उसाच्या शेतात गायब झाला असून या परिसरात वन विभागाने गस्त सुरूच ठेवली आहे. भोसे, कवठे, शिरगाव, कर्नाळ व नावरसवाडी या मार्गाने वाहत असलेल्या ओढा पात्रालगत दाट झाडी असल्याने या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे वन विभागाने मान्य केले असून नागरिकांनी रात्री शेतात फिरताना सावध राहावे, बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.