लोकसभा निवडणुकीनंतर पध्दतशीरपणे बाजूला सारण्यात आल्यामुळे नाराज झालेले आमदार वसंत गिते यांची सोमवारी पक्षाच्या अन्य तीन आमदारांनी भेट घेऊन समजूत काढली आणि मग, राज ठाकरे आणि गिते यांची धावती भेट घडवून या नाटय़ावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पायाच्या दुखापतीमुळे आदल्या दिवशी भेट टाळणाऱ्या गिते यांच्या आजारावर राज हे आता मुंबईतील डॉक्टरांमार्फत इलाज शोधणार आहेत. गिते यांनी आपण नाराज नसल्याचे सांगून मनसेचे काम करणार असल्याचे म्हटले आहे. या घडामोडींद्वारे मनसेत स्थानिक पातळीवर उभे दोन गट पडल्याचे स्पष्ट आहे.
कित्येक वर्ष गिते यांच्या हातात एकवटलेली मनसेची स्थानिक सूत्रे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसात आ. उत्तम ढिकले कुटूंबियांच्या हातात गेल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम गिते यांच्या नाराजीत भर पडण्यात झाली. यामुळे रविवारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी गिते उपस्थित नव्हते. केवळ गितेच नव्हे तर, त्यांचे समर्थक पदाधिकारी व नगरसेवकांनी दांडी मारून नाराजी प्रगट केली होती. गिते हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर असल्याची वंदता असतानाच सोमवारी मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई व दीपक पायगुडे हे सकाळी गिते यांच्या निवासस्थानी पोहोचले.
संबंधितांमध्ये साधारणत: तासभर मंथन झाले. त्यानंतर गिते यांना घेऊन सारेजण शासकीय विश्रामगृहात आले. या ठिकाणी राज व गिते यांच्यात अवघे काही मिनिटे चर्चा झाली. आपण नाराज नसून पायाच्या दुखण्यामुळे येऊ शकलो नसल्याचे स्पष्टीकरण गिते यांनी दिले. यावर राज यांनी मुंबईतील डॉक्टरांची आपणास मंगळवारची वेळ मिळवून दिली असून भविष्यातही आपण मनसेचे काम करणार असल्याचे गिते यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant gite said he is not upset with party