सातारा : राज्यातील किती टक्के जनतेचे समर्थन असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेत. ते देशाचे किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले नाहीत. एक जावळीकर म्हणून आम्ही शुभेच्छा देतो, पण तुम्ही जावळी तालुक्याच्या विकासाच्या आणि जनतेच्या प्रगतीच्या आड आलात तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही कमजोर नाही, असा थेट इशारा जावळीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिला.

पाचवड (ता. वाई)- करहर मार्गे मेढा (ता. जावळी) येथे मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी मेढा येथे उद्या (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सत्काराचेही आयोजन करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर यानंतर दोन्हीही कार्यक्रम रद्द झाले. यानंतर त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली.

जावळी तालुक्यातील रहिवासी व सध्या ठाणे-मुंबई परिसरातील उद्योजक दत्तात्रय पवार भालेकर यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. काही स्वार्थी आणि भ्रष्ट नेत्यांची वक्रदृष्टी लागली आहे. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीवर चौकशीची मागणी करून एका उदयोन्मुख उद्योजकाच्या पायात खोडा घालण्याचा प्रयत्न काही अपवृत्तींकडून सुरू असल्याचा आरोप वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे यांनी केला आहे. तालुक्याचे आमदार व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विनंतीमुळे हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वसंतराव मानकुमरे म्हणाले, आम्ही आदेश मानून मोर्चा स्थगित केला, पण याचा अर्थ आम्ही भीतीपोटी मागे हटलो असा होत नाही. पोलिसांनी परवानगी दिली किंवा नाकारली, रस्त्यावर संघर्ष करण्याची हिंमत आमच्यात आहे. अनेकदा विनापरवानगी आंदोलन केले आहे. परिणामाची चिंता आम्हाला यापूर्वी कधीच नव्हती आणि आम्ही केली देखील नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्याबरोबरचा संघर्ष आमच्यासाठी नवा नाही. आमचे राजकारण कायम संघर्षात आहे. त्यामुळे जावळी तालुक्यात इथून पुढे ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. गल्ली ते दिल्ली आमचीच सत्ता आहे. मोर्चा काढण्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि रोखलं तरी त्याला आम्ही जुमानत नाही. मात्र, कायदा हातात घेऊन आमचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अडचणीत आणू इच्छित नाही, असेही मानकुमरे यांनी सांगितले.