उत्तरप्रदेशात भाजपाला बहुमत मिळालं असून त्याच श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. अमोल कोल्हे यांनी भाजपाचे अभिनंदन करत त्यांचं कौतुक केलं आहे. उत्तर प्रदेशात एकाच पक्षाला वीस वर्षानंतर लागोपाठ सत्ता खेचून आणण्यात यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली होती. याचा परिणाम असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पाच राज्यातील निवडणुका झाल्या आहेत. जनतेने कौल दिला त्याचा नक्कीच आदर आहे. भाजपाला यश मिळालं, त्यांचं अभिनंदन केल पाहिजे. उत्तरप्रदेशात एकाच पक्षाला वीस वर्षानंतर लागोपाठ सत्ता खेचून आणण्यात यश आले आहे. यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली होती. याचाही परिणाम झाल्याचं दिसत आहे,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

“उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या ८० जागा वाढल्या असून शंभरीचा आकडा पार केला आहे. अखिलेश यादव यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे ज्या प्रकारे मुसंडी मारली आहे. प्रियांका गांधी यांच्या रोड शोला जो प्रतिसाद, गर्दी झाली. ही भविष्यकाळातील चुणूक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोवा आणि मणिपूर राज्यातील निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर झाली आहे. पंजाबमध्ये आपला मिळालेलं बहुमत हे कौतुकास्पद आहे. ही दिल्लीतील कारभाराची पोचपावती आहे,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. 

“उत्तर प्रदेशच्या राजकारणात विरोधकांनी बेरोजगारी, महागाई किंवा कोविड काळात झालेली हेळसांड याकडे लक्ष वेधण्याचा जास्त प्रयत्न केला होता. पण उत्तर प्रदेशच्या जनतेने या मुद्द्यांपेक्षा भाजपावर विश्वास ठेवला आहे. सर्व राज्यात विरोधक एकवटले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी या निकालापासून सुरुवात असेल,” असेही कोल्हे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory in uttar pradesh is due to pm narendra modi says mp amol kolhe abn 97 kjp