"शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?" सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला | vijay shivtare on sharad pawar statement maharashtra karnataka border dispute 48 hours rmm 97 | Loksatta

“शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला

पुढील ४८ तासांत सीमावाद शांत झाला नाही, तर मला कर्नाटकात जावं लागेल, असं विधान शरद पवार यांनी केलं होतं.

“शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार?” सीमावादावरून विजय शिवतारेंचा खोचक टोला
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटला आहे. हा वाद पुढील ४८ तासांत शांत झाला नाही, तर मला कर्नाटकात जावं लागेल, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केलं होतं. पवारांच्या या विधानावरून शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी खोचक टोला लगावला आहे.

४८ तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? असा सवाल शिवतारे यांनी विचारला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी शिवतारे म्हणाले की, “सीमावादावरून शरद पवार शंभर टक्के राजकारण करत आहेत. ते आता म्हणत आहेत की, ४८ तासांत काही झालं नाही तर मी स्वत: तिथे जाऊन लोकांना धीर देतो. पण ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्याकाळात त्यांनी काय केलं? त्यावेळी सीमावाद का सोडवला नाही?” असे प्रश्न शिवतारे यांनी विचारले.

हेही वाचा- VIDEO: दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा जल्लोष, मनोज तिवारींच्या ‘रिंकीया के पापा’ गाण्यावर डान्स

“एखाद्या गोष्टीचं राजकारण करून मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवण्याचं काम केलं जात आहे. हे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. प्रचंड वेगाने निर्णय घेत आहे. महाविकास आघाडीला तीन वर्षात जे जमलं नाही, ते सगळे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने अवघ्या तीन महिन्यात घेतले आहेत. या निर्णयांमुळे या सरकारची लोकप्रियता आणखी वाढेल आणि आपल्याला अडचण निर्माण होईल, यासाठी केलेलं हे नाटक आहे,” असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला.

हेही वाचा- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: फडणवीसांची अमित शाहांशी फोनवरून चर्चा , नेमकं काय बोलणं झालं?

शिवतारे पुढे म्हणाले, “४८ तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? उगीच काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय केलं? असा माझा सवाल आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात आहे, तिथे चांगल्या पद्धतीने बाजू मांडून निर्णय घेता येतील,” असंही शिवतारे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 20:38 IST
Next Story
सीमाभागातील कारवायांविरोधात कोल्हापुरात शनिवारी ‘मविआ’चे धरणे आंदोलन