लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभेला वेग आला आहे. विविध आश्वासने देऊन मतदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवारांचं आता एक भाषण व्हायरल होतंय. यामध्ये त्यांनी पाहिजे तेवढा निधी देऊ, पण कचा कचा बटणं दाबा, असं वक्तव्य केलं आहे. यावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

इंदापूर येथे डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत आज अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करू. पाहिजे तेवढा निधी देऊ, पण मशीनमध्ये बटणं दाबा कचा कचा. म्हणजे मलाही बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता होईल.

हेही वाचा >> VIDEO : “माझा रेकॉर्ड…”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला…”

रोहित पवार काय म्हणाले?

अजितदादांनी सभेत भाषण करताना निधीबाबत वक्तव्य केल्याचं समोर आलं. दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत? मलिदा गँगचे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्रांकडे असलेल्या निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचारसंहितेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी!, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

याच भाषणांत अजित पवारांनी मिश्किल टिप्पणीही केली. ते म्हणाले, “मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा अर्थमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. मी राज्यासाठी अनेक गोष्टी केल्या. मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामासाठीच गेलो. मी सत्तेला हापापलेला माणूस नाही. मी अनेक वर्षे अनेक पदांवर होतो. मी पाच ते सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आहे. माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. अलीकडे आम्ही काम नाही केलं की लोक पार्सल बाजूला करतात. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

आमचं नाव घेतलं की चांगले उपचार द्या

उपस्थित डॉक्टरांबरोबरही त्यांनी मिश्किल संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “तुम्ही सहज खूप काही काम करू शकता. माणूस खरं कोणाशी बोलतो तर तो डॉक्टरशी बोलतो. कारण काय वेदना होतात हे सांगितल्याशिवाय त्यावर उपचार होत नाहीत. त्याला उपचार करत असताना थोडंसं काय कसं चाललंय, मनात काय आहे, असं विचारा. त्यांनी आमचं नाव घेतलं तर खूप चांगली वागणूक द्या, दुसरं नाव घेतलं तर असं इंजेक्शन टोचा की…”, असं म्हणाले. पण पुढे ते सॉरी बोलून मला असं काही म्हणायचं नाही, असंही म्हणाले.